चंदीगड – पंजाब कॉंग्रेसमध्ये काही क्षुल्लक मतभेद असले तरी त्याची लवकरच सोडवणूक केली जाईल आणि पंजाबातील कॉंग्रेस एकसंधच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्या राजींदरकौर भट्टल यांनी केले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी काल भट्टल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले आहे. त्या म्हणाल्या की, अमरिंदरसिंग यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. त्यात राजकारण नाहीं.
एकेकाळी भट्टल आणि अमरिंदरसिंग यांच्यात मोठेच राजकीय वैमनस्य होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीला महत्त्व दिले जात आहे. मुख्यमंत्री सध्या आपले समर्थन मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे सांगितले जाते.
परवाच त्यांनी कॉंग्रेसच्या 55 आमदारांची आणि आठ खासदारांची एक बैठक मेजवानीच्या निमित्ताने आयोजित केली होती. भट्टल म्हणाल्या की, पक्षात काही किरकोळ मतभेद असले तरी आम्ही ते त्वरित सोडवू. आम्ही आता आमचे सारे लक्ष आगामी निवडणूक जिंकण्याकडे केंद्रीत केले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.