पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आम्ही उत्सवासाठी तयार, परंतु न्याय सर्वांना समान द्या, अशी भूमिका गणपती मंडळांच्या प्रतिनिधींनी महापालिकेत बुधवारी झालेल्या बैठकीत मांडली. पुणे, पाेलिस आणि प्रशासनाने गणेशाेत्सवाच्या संदर्भात केलेल्या नियमांचे पालन हे सर्वच मंडळांनी केले पाहिजे.
आम्हांलाही ध्वनी प्रदूषण नकाे आहे, ढाेल – ताशा पथकासंदर्भातील नियमावलीचे पालन केले जात नाही, अशी कैफीयतही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला शहराच्या विविध भागातील रहिवासी संघाचे प्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, डाॅक्टर उपस्थित हाेते.
महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
या बैठकीत ध्वनी प्रदूषण, वाहतूक काेंडी, वर्षभर निघणाऱ्या विविध मिरवणुकांमुळे नागरीकांना हाेणारा त्रास, रुग्णवाहिकांना न मिळणारी वाट, ढोलताशांच्या पथकांच्या सरावामुळे दोन महिने आवाज सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या. सरावाच्या दिवस आणि ठिकाणांबाबत नियमावली तयार करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मंडळाच्या कार्यकर्त्यांना वेगळ्या नजरेतून पाहिले जात असल्याची खंत संदीप काळे, गणेश घोष यांनी व्यक्त केली. अनेक सामाजिक कामे मंडळे करतात, तर त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहिजे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
गणेशाेत्सव पाहण्यासाठी सगळीकडून लाेक येतात, याचा अर्थ गणेशाेत्सव चांगला आहे. ध्वनी प्रदूषण आम्हांलाही नको आहे. जसे की वाहनांची गती मर्यादित करण्यासाठी स्पीड लाॅक वापरले जाते, तसेच आवाजाची मर्यादा लाॅक करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषप्रमुख महेश सूर्यवंशी यांनी केली.
पर्यावरणप्रेमी, डॉक्टर आदींच्या प्रतिक्रिया
– ढोल ताशाची संख्या कमी करा, नियमावली तयार करावी.
– कार्यकर्त्यांचे प्रबोधन करा
– डीजे आणि लेजर लाइटच्या वापराला मनाई करा
– रुग्णालय परिसरात आवाज नको
– रुग्णवाहिका, डॉक्टर, नर्स यांना वेळेत पोहोचणे आवश्यक
– वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला तर जबाबदार काेण ?
– आवाजामुळे हृदय राेग अािण रक्तदाबाचे रुग्ण वाढतात.
– सायलेंट झोनमध्ये मंडळांना परवानगी देऊ नये
– अश्लील गाणी वाजवू नये.
कार्यकर्त्यांच्या सूचना
– पथकाची संख्या मर्यादित ठेवा
– दिशादर्शक फलक लावावेत
– पार्कींगची व्यवस्था करावी
– सार्वजनिक शाैचालये स्वच्छ ठेवावी, माेबाइल टाॅयलेट उपलब्ध करावेत.
– परवानगीसाठी एक खिडकी याेजना राबवावी
– महावितरणने घरगुती दराने वीजबील आकारावे
– ढाेल ताशा पथक, ध्वनी क्षेपक आदी नियमांबाबत समान न्याय ठेवा
प्रशासनाचे म्हणणे – डाॅ. राजेंद्र भाेसले, आयुक्त, पुणे महापालिका
– ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीत मंडळांनी नियम पाळावेत.
– ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीसाठी नंबर जाहीर केला जाईल.
– मंडळाच्या उत्पन्नासाठी जाहीरातीसाठी धोरण केले जाईल.
– पूर्वीचे सर्व निर्णय कायम राहतील.
– कमानीमुळे रस्त्याची रुंदी कमी होणार नाही याची काळजी घेऊ, स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाईल.
– फूटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमणे काढली जातील.
– वाहतूक, सीसीटीव्ही, तात्काळ प्रतिसाद पथक, मेट्रोसंदर्भातील सूचना योग्य असून, त्यावर कार्यवाही केली जाईल
– पथकांनी ढोल ताशाच्या सरावासाठी नो रेसिडन्स झोन शोधावा.
– मूर्ती विक्री परवानगी लवकर दिली जाईल’