टीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांचा कॉंग्रेसवर पलटवार We are not sheep or buffalo to sell and sell
हैदराबाद – तेलंगणमधील सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीमध्ये (टीआरएस) प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये आणि प्रदेश कॉंग्रेसच्या नेतृत्वामध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. आमची खरेदी-विक्री व्हायला आम्ही मेंढ्या किंवा म्हशी नाही, असा पलटवार त्या आमदारांनी कॉंग्रेसवर केला आहे.
अलिकडेच तेलंगणमधील 18 पैकी 12 म्हणजे दोन-तृतीयांश आमदारांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन टीआरएसमध्ये प्रवेश केला. त्या घडामोडीवर तेलंगणमधील कॉंग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. टीआरएसमध्ये दाखल होण्यासाठी आमदारांना भीती दाखवण्यात आली. त्यांची खरेदी करण्यात आली. त्यांना आमीषे दाखवण्यात आली, असा कॉंग्रेस नेत्यांचा सूर आहे. त्यावरून टीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांनी बुधवारी भूमिका मांडली.
भीती दाखवायला आम्ही लहान मुले नाही. कुठल्या आमीषालाही भुलणाऱ्यांपैकी आम्ही नाही, असे त्यांनी म्हटले. कॉंग्रेस नेत्यांचे आरोप निराधार आहेत. जनतेच्या हितासाठी आणि आमच्या मतदारसंघांच्या विकासासाठी आम्ही सत्तारूढ पक्षात प्रवेश केला. घटनेतील तरतुदींना अनुसरून असेच आमचे पाऊल आहे. आमचे चारित्र्यहनन केले जात असल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल करण्यास आम्ही कचरणार नाही, असा इशाराही त्या आमदारांनी दिला.