“एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांना आम्ही घाबरत नाही”; अमित शहांचा ओवेसींवर निशाणा

निर्मल:  देशातील आगामी विविध राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापताना दिसत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना तेलंगण राष्ट्र समितीवाले घाबरत असतील. पण आम्ही अजिबात घाबरत नाही, असे म्हटले आहे.

तेलंगण येथील निर्मल येथे एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची तेलंगण राष्ट्र समिती असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला घाबरते. म्हणूनच तेलंगण दिवस साजरा करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

एमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांना भाजप घाबरत नाही. अन्य लोकांचे माहिती नाही. ओवेसी यांना पुढे करून त्यांच्या मागे लपणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की, तेलंगणमधील जनता आता जागी झाली आहे. ओवेसींना पुढे करून आता ते वाचू शकणार नाही, असा इशारा देत तेलंगणमध्ये सत्तेत आल्यास १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ति दिवस साजरा करू, असा एल्गार अमित शहा यांनी यावेळी बोलताना केला.

तेलंगण राष्ट्र समिती पक्षात दम राहिलेला नाही. ते काँग्रेस आणि एमआयएमला टक्कर देऊ शकत नाही. त्यामुळे राज्यातील जनतेकडे भाजपचा सक्षम पर्याय बनू शकतो, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. दरम्यान, भारताला स्वातंत्र मिळाल्यानंतर निजामाने विलिनीकरणास नकार दिला होता. मात्र, तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन सैन्याला पाचारण केले आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद भारताचा एक अविभाज्य भाग बनला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.