तृणमूलशी कुस्ती पेक्षा दोस्ती करण्यात आम्हाला स्वारस्य : कॉंग्रेस

कोलकाता – तृणमूल कॉंग्रेस पक्षाशी कुस्ती करण्यापेक्षा आम्हाला त्यांच्याशी दोस्ती करण्यात अधिक स्वारस्य आहे असे पश्‍चिम बंगाल मधील कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिप्तीमन घोष यांनी म्हटले आहे.

या पक्षाशी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर जुळवून घेण्याचा प्रस्ताव आमच्यापुढे खुला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे आमच्या पुढचे समान उद्दीष्ट आहे. त्या आधारावर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे.

तृणमूलने आम्ही पुढे केलेला मैत्रीचा हात या आधी झटकला आहे. पण तरीही आम्ही हा हात पुढे करीत आहोत असेही त्यांनी नमूद केले. पण त्याचवेळी आम्ही त्यांच्यापुढे किती वेळा मैत्रीचा हात पुढे करायचा असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. तथापि पश्‍चिम बंगालमध्ये राज्य कारभारात त्यांच्याकडून चुका झाल्या तर त्यांच्या कारभारवर टीका करण्यासही आम्ही मागे पुढे पहाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेवर प्रतिक्रीया देताना तृणमुलचे नेते तपस रॉय यांनी म्हटले आहे की कॉंग्रेस व तृणमुल कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येण्याच्या संबंधात ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी हे नेतेच निर्णय घेतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.