राज्याच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध – आदित्य ठाकरे

क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने महाकॉन-2020चे आयोजन

मुंबई – राज्याची सर्वसमावेशक प्रगती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. म्हणूनच राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिक यांनी एकमेकांच्या विश्‍वासाने काम केल्यास आपल्या राज्याला सर्वस्तरावर पुढे नेऊ शकतो, असे मत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्‍त केले. पर्यावरणपूरक बांधकामांना सर्वात आधी प्राधान्य दिले जावे, पर्यावरणाचा समतोल साधत पायाभूत सुविधांचा विकास केला जावा, असेही त्यांनी व्यक्‍त केले.

“क्रेडाई महाराष्ट्र’ यांच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन “महाकॉन 2020’चे आयोजन केले होते. “गृहनिर्माण क्षेत्रासमोरील आव्हाने आणि गृहनिर्माण क्षेत्राच्या भविष्यासाठी योजना’ यासंदर्भातील यावेळी चर्चा झाली. 57 शहरांतील 700 हून अधिक सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला. ठाकरे यांच्यासह आमदार ऋतुराज पाटील, रोहीत पवार उपस्थित होते.

“क्रेडाई नॅशनल’चे अध्यक्ष सतीश मगर, चेअरमन जक्षय शहा, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, अनंत राजेगावकर यांच्या हस्ते महाकॉन 2020′ अधिवेशनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, नॅशनल स्टॉक एक्‍सचेंजच्या व्हाईस प्रेसिडेंट रचना भुसारी, सीए विपुल लाठी आदी वक्‍त्यांची भाषणे झाली. “महारेरा’चे प्रमुख गौतम चॅटर्जी यांनी “महारेराची अंमलबजावणी’ याविषयी आपली मते मांडली.

आपल्या कामाच्या गुणवत्तेवर बांधकाम व्यावसायिकांनी आपली प्रतिमा निर्माण करावी. त्यातूनच ग्राहकांचे समाधान जपले जाईल जे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. पर्यावरण पूरक कामे व्हावीत, अशी सरकारची इच्छा आहे. मेट्रोसारख्या सुविधा आपण मोठ्या शहरांमध्ये निर्माण करत असलो तरी छोट्या शहरांसाठीदेखील अशा सुविधा कशा देता येतील याचा विचार करणे आवश्‍यक आहे. “मिशन रोजगार’ ही संकल्पना संपूर्ण राज्यभरात राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. याशिवाय समान बांधकाम नियम करणे ही काळाची गरज आहे. तसेच, विकसकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आमची बॅंकांशी चर्चा सुरू आहे. एसआरए स्कीम्समध्येही मोठ्या बदलाची आवश्‍यकता आहे. याची जाणीव सरकारला आहे. हाऊसिंग संदर्भातील काही अडचणी निश्‍चितच आहेत त्यावर आपण एकत्रितपणे उत्तर शोधू, असेही ठाकरे म्हणाले.

बांधकाम व्यवसाय इतर अनेक विषयांशी जोडलेला आहे. या क्षेत्राची मोठी पकड राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आहे. त्यामुळेच या क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू, असे पवार म्हणाले. याशिवाय आमदार पाटील यांनी सोशल मीडिया विषयीची आपली मते यावेळी मांडली. “उत्तुंग झेप’ आणि “महारेरा मॅन्यूअल 2020′ या दोन पुस्तकांचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.