…तर आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र – शिवसेना

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा प्रमुख राजकीय पक्ष अचानक करू लागले आहेत. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका मुदतीपूर्वी घेण्याच्या हालचाली कोणी करत आहे काय, असा सवाल शिवसेनेने केला आहे. तसेच, इतर स्वबळावर लढणार असतील तर आम्हाला राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर एकत्र यावे लागेल, असे सूतोवाचही केले आहे.

राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीचा घटक असणाऱ्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा लावून धरला आहे. अशात भाजपचे एक महत्वाचे नेते रावसाहेब दानवे यांनीही त्यांचा पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले. त्याचा संदर्भ घेऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. तसेच, सध्याचा मित्रपक्ष असणाऱ्या कॉंग्रेसला आणि ताटातूट झालेल्या भाजप या जुन्या मित्रपक्षाला शाब्दिक चिमटे काढले आहेत.

ज्याच्यापाशी बहुमत असेल; त्याचे सरकार बनेल. बहुमताच्या आकड्यांचा खेळ ज्याला जमेल, तो गादीवर बसेल. राजकारणात इच्छा, महत्वाकांक्षा असायला हरकत नाही. पण, बहुमताचा आकडा नसेल तर बोलून आणि डोलून काय होणार? मी पुन्हा येईन, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते. पण, ते आले नाहीत, अशी टिप्पणी अग्रलेखात करण्यात आली आहे.

स्वबळावर लढून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करण्यात चुकीचे काहीच नाही. भाजप आणि कॉंग्रेससारखे पक्ष त्या दिशेने तयारी करत आहेत. आता प्रश्‍न उरतो तो शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा. इतर स्वबळावर लढणार असतील तर आम्हाला राज्याच्या हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल, असे म्हणत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे कॉंग्रेसला इशाराही दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.