नवी दिल्ली – हैदराबाद पालिका निवडणुकीमध्ये वर वर दोन पक्षांमधील लढाई दिसत असली तरी एआयएमआयएम, भाजपाबरोबरच टीएमसीही या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि एआयएमआयएममध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
यातच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मंदिर – मस्जिद या मुद्द्यावरुन भाजपाचे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रचारावेळी बोलतांना ओवेसींनी शाह यांच्यावर आम्ही नेहमी जोडण्याची भाषा करतो तर तुम्ही नेहमी तोडण्याच्या भूमिकेत असता हाच तुमच्यात आणि आमच्यातला फरक आहे. असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी
”तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपयांची मदत करणारे लोक आहोत. आम्ही नेहमी जोडण्याची भाषा करतो तर तुम्ही नेहमी तोडण्याच्या भूमिकेत असता हाच तुमच्यात आणि आमच्यातला फरक आहे”
दरम्यान, नवनवे प्रदेश पादाक्रांत करण्यावर भाजपचा भर आहे. तेलंगणा हे त्यातील नवे इप्सित. डुब्बाक मतदारसंघातील विजयाने भाजपला तेलंगणा लक्ष्य करण्याचा आत्मविश्वास दिला आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांसाठी भूपेंद्र यादव यांची पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती. हेच यादव आताच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकांत देखील भाजपचे प्रभारी होते. तेव्हा तेथील भाजपची कामगिरी पाहता यादव यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास दुणावलेला असल्यास नवल नाही. यादवही हैदराबादमध्ये लगेच कामाला लागले आहेत आणि केवळ हैदराबाद महानगरपालिकेतच नव्हे, तर तीन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांतही भाजपच विजयी होईल अशी गर्जना केली आहे.