आम्हालाही पुन्हा अस्तित्व दाखवून द्यावेच लागेल

कोपरगाव – लोकसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नसल्याने आम्हालाही आमचे अस्तित्व दाखवून द्यावे लागेल, असा इशारा नरेंद्र मोदी विचार मंचाने दिला आहे. तसेच कुणाच्या मागे उभे राहायचे, याचा निर्णय अजूनही घेतलेला नाही. असे सांगितले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजी व माजी खासदार निवडणुकीस उभे आहेत. जर कै. सूर्यभानजी वहाडणे यांच्या समवेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक डावलले जाणार असेल, तर कुणाला पाठिंबा द्यायचा, असा विचार कार्यकर्ते करू लागले आहेत. कारण विजयराव वहाडणे हे सर्वोच्च मतांनी नगराध्यक्षपदी निवडून येऊनही जर जाणीवपूर्वक त्यांना टाळले जाणार असेल, तर आम्हालाही पुन्हा एकदा आमचे अस्तित्व दाखवून द्यावेच लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही आम्हाला बोलाविले गेले नाही. नगराध्यक्ष वहाडणे यांचा द्वेष करणाऱ्या प्रवृत्तीच्या सांगण्यावरूनच असे प्रकार सुरू असावेत.

नरेंद्र मोदी विचार मंच फक्त शेतकरी व सामान्य नागरिकांनाच बांधील आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात कै. सूर्यभानजी वहाडणे यांनी घडविलेले असंख्य कार्यकर्ते आहेत. याचे भान नेतेमंडळींनी ठेवलेले बरे. नरेंद्र मोदी विचार मंचच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जे जपतील त्यांचाच विचार आम्ही करणार आहोत. ज्यांना भाजपच्या संघटनेचे महत्त्व कळत नाही, तेच तालुक्‍यात नेते म्हणून मिरवीत आहेत. त्यांच्याबद्दल मतदारांचे काय म्हणणे आहे, हे समजून घ्या. मगच वस्तुस्थिती लक्षात येईल, अशी माहिती विचार मंचाचे सुभाष दवंगे, विनायक गायकवाड, सुभाष शिंदे व चेतन खुबानी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.