Tauba Tauba Reel Controversy : – माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरुद्ध दिल्लीच्या अमर कॉलनी पोलिस ठाण्यात अपंगांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलचे कार्यकारी संचालक अरमान अली यांनी ही तक्रार केली आहे. क्रिकेटपटूंशिवाय मेटा इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांच्या नावाचाही या तक्रारीत समावेश आहे.
खरे तर नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या लिजेंड क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करून ट्रॉफीवर कब्जा केला होता. यानंतर हरभजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये हरभजन, सुरेश रैना आणि युवराज सिंग बॉलीवूड स्टार विकी कौशलच्या ‘हुस्न तेरा तौबा तौबा’ या गाण्याच्या धर्तीवर लंगडत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर वेदना दाखवण्याचा अभिनय करत आहेत.
हरभजनने व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, 15 दिवस सतत खेळल्यानंतर संपूर्ण शरीर सुन्न झाले आहे. हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाला. यानंतर युजरने तिघांवर आपला विरोध व्यक्त करत व्हिडिओला अपंगांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
व्हिडिओ डिलीट अन् भज्जीची माफी…
भज्जीने नंतर व्हिडिओ काढून टाकला आणि माफीही मागितली. त्यांनी पोस्ट केले आणि लिहिले की, त्यांचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला दुखावण्याचा हेतू नव्हता. हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवला आहे.
मानसी जोशीनेही घेतला आक्षेप
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी बॅडमिंटनपटू मानसी जोशी हिने आक्षेप घेतला. तिने इंस्टाग्रामवर आपल्या दीर्घ पोस्टमध्ये लिहिले की, तुमच्यासारख्या क्रिकेट स्टार्सकडून जबाबदारी अपेक्षित आहे. कृपया अपंग लोकांची चेष्टा करू नका. हा विनोद नाही.