थिरूवनंतपूरम – केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात सोमवारी पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार समाप्त झाला. त्या मतदारसंघात बुधवारी (१३ नोव्हेंबर) मतदान होईल. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उमेदवार म्हणून नशीब आजमावत असल्याने ती पोटनिवडणूक लक्षवेधी बनली आहे.
अखेरच्या दिवशी प्रियंका यांच्या प्रचारात त्यांचे बंधू आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही सहभागी झाले. राहुल यांनी लोकसभेतील वायनाडची जागा रिक्त केल्याने तिथे पोटनिवडणूक होत आहे. कॉंग्रेसने त्या मतदारसंघात प्रियंका यांना उमेदवारी दिली. उमेदवार म्हणून त्या प्रथमच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात केरळमधील सत्तारूढ डाव्या आघाडीने सत्यन मोकेरी, तर भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे वायनाडमधील पोटनिवडणुकीला तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अर्थात, तो मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यातून प्रियंका यांच्या संसदेतील एन्ट्रीची निश्चिती करण्यासाठी पक्षाने वायनाडसारख्या सुरक्षित मतदारसंघाची निवड केल्याचे मानले जाते. मात्र, प्रियंका यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चकित करणाऱ्या निकालाची अपेक्षा आहे. तो निकाल जाहीर होण्यासाठी २३ नोव्हेंबर या दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.