जीवनगाणे: “शांती’ची वाट…

अरुण गोखले

संतांचे सांगणे, शिकविणे हे काही आगळे वेगळे असते हेच खरे. पैठणचे संत एकनाथ महाराज म्हणजे मूर्तिमंत शांतीब्रह्म. एके दिवशी एक सधन माणूस नाथांकडे आला. त्यांनी नाथांना विचारले, “”महाराज! मला तुमच्यासारखी शांती लाभावी यासाठी मी काय करू?”
त्या माणसाकडे पाहात आणि क्षणभर डोळे मिटून घेत नाथ त्याला म्हणाले, “”बाबारे! आता कसला शांतीचा विचार करतोस? तो विचार करण्याइतका वेळ तुझ्याकडे राहिलेला नाही.”
“”म्हणजे?” त्याने विचारले.

तेव्हा हलक्‍या आवाजात ते म्हणाले, “”बाबारे! आता तू अवघ्या आठ दिवसांचा सोबती राहिलेला आहेस? आता कसली शांती! आता जायचा विचार करा म्हणजे झालं…” आणि इतकं बोलून नाथ आतल्या खोलीत निघून गेले. “आता तू फक्‍त आठ दिवसांचाच सोबती राहिला आहेस’ हे शब्द त्याने ऐकले खरे. मात्र, आठ दिवस उलटून गेले. नववा दिवस उजाडला. त्याने धावत येऊन नाथांच्या पायावर लोळण घेतली. नाथांनी त्याला जवळ घेत विचारले, “”काय रे बाबा काय झाले?” त्यावर तो म्हणाला, “”महाराज! तुमच्या त्या “जाण्याचं भान ठेवं’ या शब्दांनीच माझं सार जीवनच बदलून टाकलं. या आठ दिवसांत मी कोणाशी भांडलो नाही, कोणाला शब्दाने, कृतीने इतकेच काय पण साधे मनानेही दुखवले नाही.

कोणाचा राग केला नाही. सारे व्यवहार दक्षतेने पूर्ण केले. देणी देऊन टाकली. कर्जदारांना माफी दिली. ज्यांच्याशी हेवेदावे होते ते मिटवले. सर्वांशी प्रेमाने सलोख्याने आणि आपलेपणानी वागत आलो. एक सारखा मनात हाच विचार येत होता की, आता जाताना तरी कोणाचे मन दुखवायला नको. कोणाला आपल्यामुळे त्रास नको. उद्या आपल्यामागे कोणी बोटे मोडायला नकोत. या आठ दिवसांत मी फार सावधगिरीने वागलो. महाराज! आता देवाच्या कृपेने मी वाचलोय. आता मला शांतीची वाट दाखवा”

नाथ म्हणाले, “”बाबारे! मी तुला कशाला ती वाट सांगायला आणि दाखवायला हवी. ती वाट तर तुला गेल्या आठ दिवसांतल्या जाण्याच्या भानाने कळली आहे. जाण्याचं भान राखणे हीच खऱ्या सुख, शांती अन्‌ समाधानाची वाट आहे. नाथांचा बोध ऐकला आणि एक नवा जीवन संदेश घेऊन तो माणूस एका वेगळ्याच समाधानाने बाहेर पडला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×