वाठार बुद्रुक खून प्रकरण | संशयितांकडून दोन पिस्तूल जप्त

लोणंद (प्रतिनिधी) – येरवडा कारागृहात झालेल्या वादानंतर जामिनावर सुटल्यावर मंगेश सुरेश पोमन (वय 35, रा. पोमननगर, पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) याचा वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत खून करून, मृतदेह नीरा उजव्या कॅनॉलमध्ये टाकल्याच्या गुन्ह्यातील दुसरा संशयित ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे, ता. हवेली, जि. पुणे) याला लोणंद पोलिसांनी नाशिकमधून अटक केली होती. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गावठी बनावटीची 2 पिस्तुले, एक जिवंत काडतूस व बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

पायगुडे याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात, तो पुणे येथून तडीपार असल्याचे निष्पन्न झाले. या खून प्रकरणातील अन्य संशयित वैभव सुभाष जगताप (वय 28 रा. पांगारे, ता. पुरंदर) याला तीन दिवसांपूर्वीच जेरबंद करण्यात आले आहे. वाठार बुद्रुक, ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा उजव्या कालव्यात 8 जूनला एक मृतदेह आढळला होता.

तपासाअंती तो मृतदेह मंगेश पोमन याचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संशयितांनी त्याचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणंद पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे संशयितांची नावे शोधून, वैभव जगतापला आधी अटक केली. त्याच्या चौकशीत या गुन्ह्याबाबत आणखी महिती मिळाली.

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना मंगेश, वैभव व ऋषिकेश यांच्यात वाद झाला होता. तिघेही जामिनावर सुटल्यानंतर दोघांनी मंगेशचा खून केला, अशी कबुली वैभवने दिली. त्यानंतर यातील दुसरा संशयित ऋषिकेशला नाशिकमध्ये पकडण्यात आले.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, अभिजित धनवट, सागर धेंडे, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, मल्हारी भिसे यांनी ही कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.