दखल: जलसंचयाचे गांभीर्य हवे !

जयेश राणे

पाणी हे मनुष्य, वृक्ष तसेच अन्य सजीव घटक यांच्यासाठी अत्यावश्‍यक आहे. तर वीजनिर्मितीतही याचा महत्त्वाचा भाग आहे. याही सूत्रांव्यतिरिक्‍त अन्य अनेक गोष्टींसाठी पाणी हे अत्यावश्‍यकच असते. असे असूनही त्याच्या संचयाविषयी उदासीनता जाणवते. निसर्गावर मनुष्य अन्याय करत आहे. तरीही निसर्ग मनुष्यावर अन्याय करत नाही. असे झाले असते, तर पृथ्वीवर जगणेच कठीण झाले असते.

मागील 2 वर्षांत महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. पैकी पहिल्यावर्षी तर मराठवाड्यातील अनेक विभाग जलमय झाले, अशी स्थिती झाली. दुसऱ्यावर्षी आदल्यावर्षाइतका चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे थोडे धास्तावायला झाले. यावर्षी तर पाऊस कमी होणार आहे, हे आधीच घोषित झालेले आहे. त्यामुळे साहजिकच बळीराजाची चिंता अधिक वाढलेली असणार आहे. पाण्यावरच शेती अवलंबून असल्याने चिंतेत वाढ होणे, चिंता वाटणे हे आलेच. ती दूर करण्यासाठी एकट्या बळीराजाने प्रयत्न करून काही होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने जलसंचयासाठी प्रयत्न केला पाहिजे.

पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील लोकांना पाणीटंचाई आणि पाऊस यांची विशेष आठवण होते. जी चिंता ग्रामीण भागातील आणि दुष्काळी भागातील लोकांना कायम सतावत असते, ती चिंता शहरवासीयांना कधी सतावते हे आता नीट कळले असेलच. 24 तास पाणी पाहिजे असते त्याशिवाय घर खरेदी करता येणार नाही. कारण 24 तास पाणी नाही तर घर खरेदी करून काय करणार? असा विचार करणारी मंडळी आपल्याकडे आहेत. निसर्ग पावसाच्या रूपात पाणी देत असतो. त्या पाण्यावर जणूकाही आपलाच हक्‍क आहे आणि त्यातूनच न कळत 24 तास पाण्याची भावना निर्माण होण्यास वाव मिळतो. आपली पाण्याची आवश्‍यकता भागली म्हणजे सर्वकाही झाले असे नाही, हे मनाने स्वीकारायला यांना किती काळ लागणार? शहरातील निवासी, अनिवासी (नोकरी- व्यवसाय यांची क्षेत्र) भागांकडून पाण्याचा कसा उपयोग होतो? हेही पाहूया.

काहीजणांना बेसीनचा नळ चालू ठेवून दात घासण्याची सवय असते. लघुशंका करण्यास गेल्यावर फ्लश करून पुढे चालूच ठेवले जाते. त्या एका फ्लशमधून 15 ते 20 लिटर पाणी वाया जाते. असे कित्येकजण दिवसभर त्याचा उपयोग करत असतात. म्हणजे केवळ टॉयलेटसाठी असंख्य लिटर पाणी फ्लशच्या माध्यमातून वायाच घालवले जाते. अशा प्रकारे पाणी वाया जात आहे. पाण्याची बचत करण्यासाठी काय करता येईल? याचा विचार झाला पाहिजे. फ्लशच्या माध्यमातून असंख्य लिटर वाया जाणारे पाणी हा अक्षरक्षः जिव्हारी लागणारा मुद्दा आहे. देशामध्ये कित्येक कोटी लोक अर्धपोटी, उपाशी झोपत असतात. कारण त्यांना पोटभर अन्नसेवन करण्यास मिळत नाही. कारण आहे, त्यांची कमकुवत आर्थिक स्थिती. म्हणजे देशात पैसा खेळता नाही असे नाही, तर तो मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचा वेग कमी आहे. तसेच जे देशबांधव-भगिनी पाण्यासाठी वणवण करतात त्यांना पाणी मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच तळमळ असली पाहिजे. येथेही वरील सूत्राप्रमाणे म्हणता येईल. देशात सर्वत्र पाण्याचा दुष्काळ आहे, असे नाही. काही ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे. आपल्याला जसे मुबलक पाणी उपलब्ध आहे, तसे त्यांनाही मिळून त्यांची वणवण थांबण्यासाठी आपण काय करू शकतो, याचा कृतीच्या स्तरावर विचार झाला पाहिजे.

इस्रायल या देशाने पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणण्यासाठी प्रकल्प चालू केले. समुद्राचे पाणी कशा प्रकारे उपयोगात आणता येईल हे त्या देशाने जगाला दाखवून दिले आहे. भारताला तर गुजरात राज्यापासून ते बंगालपर्यंत विस्तीर्ण समुद्र लाभला आहे. आकाराने मुंबई एवढा असणारा इस्रायल हा एक देश त्याला लाभलेल्या समुद्राचा पुरेपूर उपयोग करून घेत पाण्याच्या समस्येवर प्रभावी तोडगा काढतो, तर भारताने किती प्रयत्न करायला हवे होते? असा प्रश्‍न पडल्या शिवाय राहात नाही. भारताला लाभलेल्या समुद्रावरून येथे हरितक्रांती सहजपणे यशस्वी होऊ शकली असती; मात्र तसे होऊ शकले नाही. अन्यथा भारताचे नाव हरितक्रांतीत कायम अग्रेसर राहिले असते.

भारतात कशा प्रकारे शेती होते, हे पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक आले असते. सरकारी तिजोरीत जमा होणारा देशातील बहुतांश पैसा हा वेतन आयोग, भत्ते आणि अन्य सुविधा यांवर खर्च होतो. हे वास्तव आहे. त्यामुळे उरलेल्या निधीतून विकास कामे करणे ही एक तारेवरची कसरतच असते.

ज्या शहरीभागात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तिथे दुचाकी, चारचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचा उपयोग होत असतो. पाणी वेगाने फवारले जाण्यासाठी ते इलेक्‍ट्रिक मोटरच्या साहाय्याने खेचले जात असते. त्यासाठी पुष्कळ प्रमाणात वीजही खर्च होते. म्हणजे पाणी आणि वीज या दोहोंचाही अपव्ययच अधिक होतो. देशात एका ठिकाणी अशी स्थिती आहे की तिथे कळशीभर पाण्यासाठी अनेक मैल उन्हातून पायपीट करावी लागते. तसे करूनही पाणी मिळेल याची निश्‍चिती नाही. दुसऱ्या ठिकाणी मात्र त्याच पाण्यावर वाहने चमकवली जातात. त्यांना थेट पाण्याची जोडणी उपलब्ध होते.

एक लक्षवेधी विचार असा की, डोक्‍यावर सूर्य तळपत आहे. पाण्यासाठी किती मैल चालायचे आहे, हेही नक्‍की नाही. त्या कठीण स्थितीत पाण्यासाठी वणवण करायची. आपण घर, कार्यालय यांपासून थोड्या अंतरावर पायी चालत गेलो तरी काही अंतरावर पोहोचल्यावर पाणी प्यावेसे वाटते. यावरून पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांची काय स्थिती होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. बरं, हे त्यांना प्रतिदिन करावे लागते. यासह पोटाची खळगी भरण्यासाठी कसरत करणे हा वेगळाच विषय आहे. देश प्रगती करत आहे, असे म्हटले तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, देशातील बहुतांश भाग हा ग्रामीण भाग आहे. त्यांच्याही गरजा पूर्ण करण्यासाठी शहरीभागातील लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.