नऊ गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

अनेक गावांना अद्यापही टॅंकरची प्रतीक्षाच 
लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा अन्यायकारक
वाई तालुक्‍यातही दुष्काळाची छाया गडद
धनंजय घोडके

वाई – जिल्ह्यासह राज्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे. दररोज पारा 40 अंशावर जात असल्याने अनेक ठिकाणचे जलसाठे कोरडे पडल्याने पाण्याचे दुर्भिक्ष वाढले आहे. वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोसमी पावसाचे प्रमाण जास्त असूनही पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे काही गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. समोर पाणी दिसत असून कित्येक किलोमीटरची पायपीट पाण्यासाठी करावी लागते, ज्यांनी स्वतः घरावर तुळशी पत्र ठेवून धरण उभारणीसाठी जमिनी दिल्या त्यांच्या नशिबी नेहमीच फरपट पाहायला मिळते.

वाई तालुक्‍याचा पूर्व भाग पर्जन्य छायेखाली येत असून यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्याने अनेक गावांना पाण्याची टंचाई झाली आहे. टंचाईग्रस्त गावांनी वाई पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाला टॅंकरची मागणी केली असून आतापर्यंत नऊ गावांना टॅंकरने पाणी पुरवठा चालू केला आहे. परंतु गावांच्या लोकसंख्येच्या आधारे टॅंकरची मंजुरी देण्यात येते हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे, ज्या गावांमध्ये लोकसंख्या कमी आहे म्हणून पाण्याचा टॅंकर प्रशासन देणार नाही का? असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे, कुसागांव जवळील विठ्ठल वाडीत प्रचंड पाणी टंचाई आहे या गावाची लोकसंख्या प्रशासनाच्या निकषात बसत नाही म्हणून टॅंकर दिला जात नाही. तरी वाई पंचायत समितीने मागेल त्या गावाला पाण्याचा टॅंकर देण्यात यावा व त्यासाठी संबंधित सदस्यांनी त्यात लक्ष घालावे अशीही मागणी जोर धरत आहे.

यामध्ये गडगेवाडी-मांढरदेव, बौद्धवस्ती-माढंरदेव, गुंडेवाडी, विठ्ठलवाडी, बालेघर, धनगरवाडी, बोपर्डी, मोहडेकरवाडी, चांदक, पाखिरेवस्ती-ओहळी इत्यादी गावांना पाणी पुरवठा चालू असून गाढवेवाडी व आनंदपुर या दोन गावांना येत्या दोन दिवससात टॅंकर सूरू करण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी उदयकूमार कुसूरकर यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार मकरंद पाटील यांनी आढावा बैठक घेवून महाबळेश्‍वर, पाचगणी, वाई, खंडाळा तालुक्‍यातील गावांची यादी पंचायत समितीला देत गावातील पाणी साठ्याबाबत पूर्वानुभव लक्षात घेऊन कोणत्याही क्षणी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते, हे लक्षात घेऊन उपाययोजना करा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी ग्रामपंचायती व प्रशाससनाला केले.

टॅंकरने पाणी पुरवठा, योजनाची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्‍यांची गळती काढणे, विहिरी व विंधनविहिरी अधिग्रहण, मंजूर कामे पूर्णत्वास नेणे, नदी -धरणातील पाणी कमी झाल्याने साठवण टाक्‍यांद्वारे पाणी पुरवठा, पाऊस सुरू होण्यापूर्वी नवीन विंधनविहिरी खोदणे, पाईपलाइन बदलणे, तरंगत्या लोकसंख्येचा विचार करून पाण्याची व्यवस्था करणे, प्रादेशिक योजनांची दुरुस्ती, तलावात कवठे- केंजळ, व नागेवाडी योजनेचे पाणी सोडणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या.

कोंडोशीसारख्या दुर्गम गावांत अन्य टॅंकर जाऊ शकत नसल्याने खासगी ऐवजी शासकीय टॅंकरने पाणी पुरवठा करावा, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ग्रामपंचायतीशी समन्वय ठेवून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पाणी पुरवठा प्रस्ताव सादर करावेत, अभ्यास करून योजनांचे प्रस्ताव व अंमलबजावणी करावी अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या होत्या.
संजय गायकवाड यांनी कोयनाकाठच्या गावात नदीऐवजी विहिरीवरून पाणी पुरवठा प्रस्तावित करावा, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे डोंगरमाथ्यावरील विंधनविहिरी 250 फुटांपेक्षा अधिक खोल घेण्यास परवानगी मिळावी, व टंचाई प्रश्‍नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. अशा पद्धतीच्या बैठकीत चर्चा होऊनही त्या कागदोपत्री राहिल्याचे चित्र वाई विधानसभा मतदार संघात दिसत आहे. तरी दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन मागेल त्या गावाला टॅंकर मिळावा अशी मागणी जोर धरत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.