पुणे (प्रभात वृत्तसेवा) – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अवघा अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या सोमवार ( दि. 4 जुलै) पासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. मात्र, हा निर्णय आठ दिवसांसाठी ( दि. 11 जुलै) पर्यंतच असणार आहे. हवामान विभागाकडून 7 ते 15 जुलै पर्यंत चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने महापालिकेकडून आठवडयाभरानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
जून महिना संपत आला तरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाख़ळीत समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे धरणाची पाणी पातळी तळाला गेली असून धरणात अवघा अडीच टीएमसी पाणीसाठा आहे. महापालिकेने पाणी कपात न केल्यास हे पाणी शहराला 15 जुलै पर्यंतच पुरेल असा निर्वाणीचा इशारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेस देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून येत्या सोमवार पासून शहरात दिवसाआड पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वेळापत्रक शुक्रवारी सायंकाळी महापालिकेने पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे.
धरणसाठा न वाढल्यास अडचण
दरम्यान, गुरूवारी रात्रीपासून खडकवासला धरणसाखळी मधील पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, या पावसाचा जोर कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानंतर 7 जुलै पासून या चारही धरणात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणी वाढण्यास सुरूवात होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.
त्यामुळे, महापालिकेनेही 7 जुलै नंतरच्या पावसाचा अंदाज घेऊन त्यानंतर पुढे कपात वाढवायची की पाणी वाढल्यास कपात रद्द करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, जून महिन्यातील पावसाबाबत हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजांना मान्सूनने हुलकावनी दिल्याने जुलै महिन्यातील पावसा बाबतही अनिश्चितताच असून धरणसाठा न वाढल्यास शहराच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.
पाणी पुरवठयाचे वेळापत्रक पाहण्यासाठी या लिंकवर क्लीक करा