काटीमध्ये नळ योजनेतून अळ्यामिश्रीत पाणीपुरवठा

उपसरपंचांकडून दिलेल्या सूचनांना फासला हरताळ : नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील काटी ग्रामपंचायतीअंतर्गत पाणीपुरवठा योजनेतून थेट नळातून भांड्यात शेकडो आळ्या सापडल्या आहेत. अनेक महिन्यांपासून ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आळ्याने थैमान घातले आहे. दलित वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील नागरिक अशुद्ध पाण्यामुळे पोटाच्या आजाराशी सामना करीत आहेत. त्यामुळे काटी गावात मोठी घाबरट सुरू झाली आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठा करीत आहे. म्हणून कर घेतला जातो. मात्र, आम्हाला आळ्यामिश्रित पाणी का देता, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

काटी-वडापुरी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील लोकसंख्येने मोठे असणारे गाव म्हणून काटी गाव ओळखले जाते. या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांना दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दोन ठिकाणच्या विहिरीवरून गावकऱ्यांना पाणीपुरवठा होतो. यापैकी दलित वस्तीच्या हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळी पाण्याची टाकी आहे. 2016 मध्ये ही पाण्याची टाकी बांधल्याची माहिती येथील रहिवाशी एस. व्ही. भोसले यांनी दिली. बांधलेल्या दिवसापासून येथील पाण्याची टाकी कधीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ केली नाही. त्यामुळे टाकीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याच्या टाकीमध्ये टिशियल टाका, पाणी शुद्ध करण्याची पावडर टाका असे कित्येकदा आम्ही ग्रामपंचायतीला कळवले आहे. मात्र, ग्रामपंचायतीने अद्यापही गोष्टीकडे कधीही लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. मागील महिन्यापासून ग्रामपंचायतीच्या पाण्यातून आळ्या येत आहेत. हेच पाणी लहान मुले, नागरिकांनी पिल्यामुळे आजारी पडत आहेत. नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहचल्यास ग्रामपंचायत प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असाही इशारा भोसले यांनी दिला आहे.

उपसरपंच शोभा माने यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांचे पती व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय माने यांनी प्रतिक्रिया दिली. माने म्हणाले की, दलित वस्तीतील नागरिकांना ग्रामपंचायतीकठून अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्यामुळे व या पाण्यातून आळ्या येत असल्यामुळे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आमच्याकडे दलित वस्तीतील असंख्य नागरिकांनी दोन महिन्यांपासून सातत्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहेत. आळ्या येत आहेत, अशी वारंवार तक्रारी केल्या आहेत. याच तक्रारी आम्ही ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला सांगितल्या. मात्र, यावर ठोस उपाययोजना झाली नाही.

ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी देण्याची भूमिका ठेवली पाहिजे. मात्र, ग्रामपंचायतीची भूमिका मात्र वेगळी दिसत आहे. शुद्ध पाणीपुरवठा करावा यासाठी आता इंदापूरचे तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती माने यांनी दिली.

  • संबंधित गावकऱ्यांनी आमच्या कार्यालयाकडे तशा आशयाची तक्रार दाखल केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू. गावाला स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी लेखी सूचना करू.
    – विजयराव परीट, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, इंदापूर.
  • ग्रामसेवकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
    इंदापूर तालुक्‍यातील काटी गावात अळ्यामिश्रीत पाणी येत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असताना ग्रामपंचायत निद्रिस्त झाले आहे. परंतू प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून हात झटकले जात असल्याचा प्रत्यय आला आहे. ग्रामसेवक खरमाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. तसेच मोबाइलवर प्रतिसाद दिला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.