पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासात चांगला पाऊस झाला. त्यामुळे एकाच दिवसात खडकवासला प्रकल्पात 1.45 टीएमसी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. एकाच दिवसात साधारणत: महिनाभर पुरेल इतके पाणी धरणात जमा झाले आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 34.71 टक्के म्हणजे 10.12 टीएमसी इतका आहे.
मागील दोन -तीन दिवसांपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढला आहे. रविवारी रात्री खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात चांगला पाऊस पडला. रविवारी रात्री खडकवासला धरणात 50 मिमी, पानशेतमध्ये 91 मिमी, वरसगावमध्ये 85 मिमी आणि टेमघर धरणात 105 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
तर रविवारी दिवसभरात खडकवासला धरणात 11 मिमी, पानशेतमध्ये 18 मिमी, वरसगावमध्ये 18 मिमी आणि टेमघरमध्ये 35मिमी इतका पाऊस पडला आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाऊसाची रिमझिम सुरु असल्याने ओढे-नाले वाहु लागले आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठयात वाढ होत आहे. शनिवारी रात्री खडकवासला प्रकल्पात 29.76 टक्के म्हणजे 8.67 टीएमसी पाणीसाठा होता त्यामध्ये आता सुमारे दिड टीएमसीने वाढ होऊन एकूण धरणसाठा 10.12 टीएमसीवर पोहोचला आहे.
धरणाचे नाव – पाणीसाठा – टक्के
खडकवासला – 1.19 टीएमसी – 60.26 टक्के
पानशेत – 4.43 टीएमसी – 41.64 टक्के
वरसगाव – 3.58 टीएमसी – 27.94 टक्के
टेमघर – 0.91 टीएमसी – 24.61 टक्के