‘मेट्रोचे स्टेशन्स कुलींगसाठी लागणारे पाणी पालिकेने द्यावे’

पुणे – मेट्रोचे स्टेशन बांधून पूर्ण झाल्यानंतर ते वातानुकुलित असल्याने ते कूल ठेवण्यासाठी रोज पाच लाख लीटर पाणी लागणार आहे. हे पाणी महापालिकेने पुरवावे असा प्रस्ताव “महामेट्रो’ने महापालिकेला दिला आहे. आधीच महापालिका हद्दीत पाणी मिळत नसल्याने आणि जलसंपदा खात्याकडून अक्षरश: मारामारी करून महापालिका पाणी आणत असताना, “महामेट्रो’ची ही मागणी म्हणजे “दुष्काळात तेरावा महिना’ अशीच झाली आहे.

“महामेट्रो’च्या पीलर्सच्या कामासाठी महापालिकेच्या नव्या विस्तारीत इमारतीच्या तळघरात असलेल्या झऱ्याच्या पाण्याचा वापर करता येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात मेट्रोच्या पिलर्सच्या कामाला पाणी लागणार नसल्याचे “महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु, मेट्रोचे स्टेशन्स उभारल्यानंतर ते वातानुकुलीत असणार आहेत. ते स्टेशन्स कूल ठेवण्यासाठी रोज सुमारे पाच लाख लीटर पाणी लागणार आहे. हे पाणी महापालिकेने पुरवावे, असे पत्र दिल्याचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिकेने पाणी पुरवण्याला जर असमर्थता दर्शवली तर बोअरच्या सहाय्याने भूगर्भातील पाणी कायदेशीररित्या वापरता येणार असल्याचे गाडगीळ यांनी नमूद केले. मुळातच शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिका एकेक थेंबासाठी जलसंपदा विभागाशी वाद घालत आहे. त्यातून पाच लाख लीटर पाणी मेट्रोला द्यायचा विषय सद्यस्थितीत शक्‍य होईल, असे वाटत नाही. परंतु, चोवीस तास समान पाणीपुरवठा प्रकल्प झाल्यावरही हे शक्‍य होईल का, तसेच महापालिका यावर काय उत्तर देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.