पाणीपुरवठा विस्कळीत : पर्वती जलकेंद्रात पुन्हा वीज बिघाड
पुणे – आधीच अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना पाण्यासाठी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. असे असतानाच, पर्वती जलकेंद्रात वारंवार होणाऱ्या वीज बिघाडामुळे लष्कर जलकेंद्रास पुरेसे पाणी जाऊ न शकल्याने बुधवारी पुन्हा या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. दरम्यान, दुपारनंतर पालिकेकडून हा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला, तरी नागरिकांकडून अद्याप पाणीच आले नसल्याचे सांगण्यात आले.
पर्वती जलकेंद्रातून लष्कर जलकेंद्राला नवीन बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पर्वती जलकेंद्रात रात्री 1 वाजता वीज पुरवठा खंडीत झाला. त्यानंतर पहाटे पाच वाजता वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे लष्कर जलकेंद्राच्या पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेले पाणी सोडता आले नाही. त्यामुळे लष्कर जलकेंद्रावरून पहाटे पासून केला जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यात चंदननगर, खराडी, विमाननगर, वडगावशेरी, येरवडा परिसरातील काही भाग, हडपसर, कोंढवा, ससाणेनगर, लुल्लानगर, महंमदवाडी या भागासह शहराच्या बहुतांश पूर्ण भागाचा पाणी पुरवठा खंडीत झाला. अचानक पाणी न आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टॅंकरची मागणीही करण्यात येत होती. दरम्यान, पहाटे पाच वाजता पर्वती ते लष्कर पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने बुधवारी दुपारनंतर शहराच्या पूर्वभागात कमी दाबाने तसेच नियोजित वेळेपेक्षा कमी पाणी सोडण्यात आले असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याचा दावा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.