Water Scarcity – मुठा खोर्यात सध्या तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून कातवडी-डावजे नदीवरील बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुठा विभागासाठी जीवनवाहिनी मानल्या जाणार्या मुठा नदीत गेल्या आठ दिवसांपासून टेमघर धरणातून पाणी सोडण्यात आलेले नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मुठा खोर्यातील अनेक गावांची शेती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच जनावरांचा पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर मुठा नदीवर अवलंबून आहे. विशेषतः कातवडी, डावजे आणि परिसरातील भागात ऊस, भाजीपाला, फळबागा तसेच इतर बागायती पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र, नदीपात्र आणि बंधार्यांमध्ये पाणीच नसल्याने शेतकर्यांसमोर पिके वाचवण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, पाणीप्रश्नावरून स्थानिक पातळीवर संताप वाढत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे. युवासेनेचे उपजिल्हाधिकारी अमित कुडले, राम गायकवाड, सरपंच रामचंद्र काळोखे, तानाजी हाळंदे, रमेश पवार, समीर शिंदे, लहू तिकोने, सार्थक दिघे, आकाश भरेकर आणि अक्षय हरपुडे यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कातवडी-डावजे : टेमघर धरणातून पाणी न सोडल्याने येथील नदीवरील बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याचे चित्र. टँकरवर अवलंबून उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना नदी कोरडी पडल्याने दुग्ध व्यवसाय करणार्या शेतकर्यांचीही अडचण वाढली आहे. जनावरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. अनेक ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पाणी न सोडल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी दिवसांमध्ये पाणीटंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. संबंधित सिंचन विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ टेमघर धरणातून मुठा नदीत पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून होत आहे. शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांचे हाल होत असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे. लवकरात लवकर नदीत पाणी सोडले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.