खेडमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद!

तालुक्‍यात पावसाची दडी, तीनही धरणांत अत्यल्प पाणीसाठा

राजगुरूनगर -गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात पिकांसह खरीप हंगामातील इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्‍यातील भात लावणी (आवणी) लांबणीवर गेली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने तालुक्‍यातील तीनही धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असून पाणीटंचईचे संकट गडद झाले आहे.

तालुक्‍यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यानंतर सोयाबीन पिकाचा क्रमांक आहे.पेरणीच्या काळात तालुक्‍यात मुबलक पाऊस झाला, रोपे उगवली; मात्र आता लावणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने भाताची लावणी रखडली आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग आदी पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. एकीकडे करोनाचे संकट तर दुसरीकडे निसर्ग साथ देत नसल्याने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पावसाने दडी मारल्याने तालुक्‍यातील चासकमान, भामाआसखेड आणि कळमोडी धरण कोरडेठाक असून त्यात अत्यल्प पाणीसाठा आहे. मागील वर्षी कळमोडी धरण भरले होते तर उर्वरित तालुक्‍यातील दोन्ही धरणात मुबलक साठा जमा झाला होता. यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने धरणसाठा वाढलेले नाही. या धरणातील पाणीसाठ्यावर खेड तालुक्‍यासह शिरूर तालुका आणि पुण्याचा काही भाग अवलंबून आहे. जर पावसाने अशीच दडी मारली तर भविष्यात पाण्याचे संकट उभे राहणार आहे.

खेड तालुक्‍यात यावर्षी जूनच्या सुरुवातील पावसाने हजेरी लावली. मात्र, ऐन पावसाळ्यात म्हणजे जुलै महिन्यात पावसाने सुरुवातीपासून उघडीप दिली आहे. करोनाच्या संकटाचा सर्वसामान्य नागरिकांसह सरकार सामना करीत आहे. तर दुरारीकडे पावसाचे अस्मानी संकट उभे राहिले आहे.

चासकमान, कळमोडीत तीनपट कमी साठा
मागील वर्षी तालुक्‍यातील कळमोडी धरण 100, चासकमान धरण 40 तर भामा आसखेड धरण 37 टक्‍के भरले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत भामा आसखेड धरणात 3 टक्‍के जादा पाणीसाठा होता. तर चासकमान व कळमोडी धरणात तीन पट कमी पाणीसाठा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.