साताऱ्याला मिळणार जलसंपदा खाते?

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाला आणि विचाराला सतत साथ देणाऱ्या सातारा जिल्ह्याला पुन्हा जलसंपदा खात्याचेच गिफ्ट मिळण्याचे संकेत आहेत. वाईचे आमदार मकरंद पाटील व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेव पाटील यांच्यात या मंत्रिपदासाठी रस्सीखेच असून मुंबईत “सिल्व्हर ओक’वर पवारांना साकडे घालण्यासाठी दोन्ही आमदार समर्थकांची गर्दी होऊ लागली आहे.

राष्ट्रवादीच्या गेल्या दोन दशकाच्या वाटचालीत शरद पवार यांना पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याने मनापासून साथ दिली. मंत्रिमंडळात संधी मिळताना राष्ट्रवादीकडून जलसंपदा विभाग, कृष्णा खोरे अशी खाती जिल्ह्याच्या वाट्याला आली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीसुध्दा जलसंपदा विभागाची जवाबदारी सांभाळली. 2014 पूर्वी शेवटच्या वर्षभरात माजी आमदार शशिकांत शिंदे यांनासुद्धा याच पदाची जवाबदारी देण्यात आली होती.

महाराष्ट्राला स्वतंत्र व प्रगल्भ नेतृत्व देणाऱ्या सातारा जिल्हयाला मंत्रिमंडळ विस्तारात कायमच डावी बाजू देण्यात आली आहे. महाशिवआघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराची महत्वपूर्ण व निर्णायक बैठक येत्या 9 डिसेंबरला मुंबईत होत आहे. त्यामुळे वाई व कराड तालुक्‍याच्या आमदार समर्थकांचे “सिल्व्हर ओक’वर शक्तीप्रदर्शन सुरूच आहे. वाई तालुक्‍यातील आमदार समर्थकांच्या शिष्टमंडळाने पवारांची मागील आठवड्यात भेट घेतली होती.

मात्र, मकरंद आबांच्या आमदारकीच्या तुलनेत आमदार बाळासाहेब पाटलांची पाच टर्मची आमदारकी सिनिअर आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा निर्णय होताना वाई की कराड अशीच खरी चुरस रंगणार आहे. पवारांनी त्यांच्या कराड दौऱ्यात बाळासाहेब पाटील यांना जवाबदारीतून मुक्त करा, असे सूचक वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या तुलनेने आमदार दीपक चव्हाण यांच्या नावाची सध्या चर्चा नसल्याने राजे गटाबाबत पवारांच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम आहे.

बाळासाहेब पाटील व मकरंद पाटील या निष्ठावान आमदारांच्या निष्ठेचे फळं पवारांना द्यावेच लागणार आहे. मात्र ती लॉटरी सुध्दा कृष्णा खोरे महामंडळाचीच असल्याने पुन्हा सातारा जिल्ह्याला किती राजकीय ताकद मिळणार हेसुध्दा पाहवे लागणार आहे. रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषद सभापती व सातारा जिल्हयाचे चाणक्‍य समजले जात असले तरी रामराजेंनी काही काळ स्वतःला राष्ट्रवादीपासून बाजूला ठेवले. पक्षांतरांच्या त्यांनी चाचपलेल्या शक्‍यता पवारांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. त्यामुळे रामराजेंचा बारामती कनेक्‍ट सध्या शांतच आहे.

शशिकांत शिंदे यांनाही संधीचा आग्रह
सध्या सातारा जिल्हयाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदारकीचे संख्याबळ घटले आहे. भाजपच्या मेगा भरतीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे तीन आमदार निवडून आले. कराड व वाई विधानसभा मतदारसंघ पवारांशी निष्ठावानं राहिले. फलटणमध्ये रामराजेंनी करिष्मा दाखवला मात्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा नाही. राष्ट्रवादीला ताकद देण्याच्या प्रयत्नात शशिकांत शिंदेसारखा धडाडीचा मोहरा कोरेगावातून राष्ट्रवादीला गमवावा लागला. साताऱ्याला कॅबिनेट मंत्रिपद व जिल्हयाचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीने राखावे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. विधानपरिषदेचे राष्ट्रवादी कोट्यातील दहा आमदार नवीन वर्षात निवृत्त होत आहेत, त्या कोट्यात शशिकांत शिंदे यांना संधी मिळावी, असा जिल्हयाचा आग्रह आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)