चांदक ग्रामस्थांचा जलआक्रोश

लोकसभेसह विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार
महिलांची सुरू आहे पाण्यासाठी वणवण
पंधरा दिवसांतून एकदाच होतोयं पाणीपुरवठा
प्रशासनासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

गाव सोडून जायचं का आम्ही?
गावाला पाण्याअभावी वाईट दिवस आले असून गावातील नोकरीनिमित्त परगावी गेलेली व्यक्ती पुन्हा गावाकडे फिरकेना झाली आहे. परगावी असलेल्या व्यक्तींना उन्हाळ्याच्याच सुट्ट्यात यात्रेनिमित्त किंवा अन्य कारणाने येणे होत असल्याने पाण्याअभावी असे परगावी स्थायिक लोक वाईमध्ये मुक्काम करीत असून देवदेव करून पुन्हा माघारी जात आहेत. शेती पूर्णतः कोरडवाहू झाल्याने आणि पाण्याची परिस्थिती गंभीर असल्याने या गावातील मुलांची लग्नसुद्धा ठरण्यात अडचणी येत असून यास प्रशासन जबाबदार असल्याच्या तीव्र भावना ग्रामस्थांकडून बोलून दाखविल्या जात असून गावात राहणाऱ्यांनी गाव सोडून जायचं का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

कवठे – वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील पाणी परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून जलप्रश्‍नाने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे ग्रामस्थांचा संताप विकोपाला गेल्याने चांदक ग्रामस्थांनी तातडीची ग्रामसभा घेऊन लोकसभेसह आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, प्रशासनासह लोकप्रतिनिधींही चांदकच्या पाणीप्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये विशेषत: महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

चांदक, ता. वाई हे गाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील डोंगरपायथ्याचे गाव असून गेले चार वर्षे अत्यल्प प्रमाणात या भागामध्ये पर्जन्यवृष्टी झाल्याने या परिसरातील पाणीपातळी अत्यंत खालावली आहे. शेतीसाठीचे पाणी ही दुर्मिळ बाब झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना झगडावे लागत आहे. पंधरा दिवसातून एकदा ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा करीत असून सर्व गावासाठी शासनाच्या वतीने प्रतिदिन दोन टॅंकर पाणी पुरवठा होत आहे. या गावाची लोकसंख्या 1800 च्या आसपास असून प्रतीदिन दोन टॅंकर पाणी पुरवठा म्हणजे नगण्य आहे.

प्रशासन दोन टॅंकर पाणी देवून गावाची चेष्ठा करीत असून प्रशासनाने हा प्रश्‍न गंभीरपणे घेण्यासाठी व जोपर्यंत प्रतिवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यात गावाला भेडसावत असलेल्या या पाणीप्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही तोपर्यंत सर्वच निवडणुका बहिष्कृत करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या गावाचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी नसून प्रशासनाविरोधी असल्याचे येथील ग्रामस्थांनी जाहीर केले असून येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कोणत्याही उमेदवारांनी आमच्या गावात मत मागायला येऊ नये, अशी विनंती ग्रामस्थांच्यामार्फत करण्यात आली आहे.

येत्या निवडणुकीमध्ये कोणतेही बूथ, टेबल लागणार नसून एकही ग्रामस्थ मतदान करणार नसल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. यावेळी महिलांनी हंडा मोर्चा काढला होता. यावेळी उपसरपंच राजेंद्र खामकर, माजी उपसरपंच गणेश संकपाळ, सदस्य व माजी उपसरपंच रमेश संकपाळ, राहुल भिलारे, मनोज भिलारे, दत्तात्रय भिलारे, बबन मोरे, भगवान खामकर ,गोपाळ दरेकर, किशोर भिलारे, गेनुबापू सावंत, आशिष संकपाळ, उत्तम खामकर, भगवान मोरे, ग्रामस्थ तसेच सर्व महिला उपस्थित होत्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.