‘भामा आसखेड’मधून विसर्ग बंद

गेल्यावर्षी 732, तर यंदा आतापर्यंत 1649 मिमी विक्रमी पावसाची नोंद

शिंदे वासुली – खेड तालुक्‍यातील भामा आसखेड धरण 100 टक्‍के भरले असून सध्या पाऊस नसल्याने धरण क्षेत्रात येणारे पाणी बंद झाले आहे. धरणातील पाण्याचे वर्षभरासाठी नियोजन करायचे असल्याने धरणाची पाणी पातळी कायम ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग पुर्णतः बंद केला असल्याचे कार्यकारी उपअभियंता भरत बेंद्रे यांनी सांगितले.

धरण क्षेत्रात गेल्यावर्षी केवळ 732 मिमी तर यंदा आतापर्यंत विक्रमी 1649 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदीवरील बंधारे ही तुडूंब आहेत. पण या बंधाऱ्यातील पाणी नदीच्या प्रवाहाद्वारे वाहून जात आहे. बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याशिवाय बंधाऱ्याला गेट घालून बंद करता येत नाहीत. गेट घातल्यानंतर कोरडे बंधारे परतीच्या पावसाने पुन्हा भरले जातात आणि डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातून पाणी सोडले जाते. धरण व्यवस्थापन विभागाकडून पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाते असे धरण प्रशासनाने माहिती दिली; परंतु परतीचा पाऊस झालाच नाही, तर मागील वर्षासारखी टंचाई सदृश्‍य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

भामा-आसखेड धरण एकूण आठ टिएमसी क्षमतेचे असून गेल्या वर्षी परतीच्या पावसाने नदीवरील बंधारे न भरल्याने धरणातून डिसेंबर पुर्वीच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सप्टेंबरला विसर्ग करावा लागला.

धरणाच्या खाली नदीकाठच्या गावांना शेतीसाठी, चाकण एमआयडीसी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना व स्थानिकांना वर्ष भर पुरेल असे नियोजन करुनच धरणातील पाणी वाटप करावे अशी नागरिकांची मागणी आहे. नाहीतर “धरण उशाला आणि कोरड घशाला’ असे म्हणायची वेळ येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)