जलशुद्धीकरण केंद्रातील सव्वातीन कोटींच्या कामात संशय
पिंपरी – महापालिकेच्या निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधील यांत्रिक व तांत्रिक देखभाल-दुरूस्तीविषयक कामे, स्थापत्य विषयक कामे करणे, केमिकल टाक्यांना सुरक्षा आवरणे बसविणे, फिल्टर शेडची वाळू बदलणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. एकाच जलशुद्धीकरण केंद्रातील ही कामे करण्यासाठी चार स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या. चारही निविदा प्रक्रियेत केवळ दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या असताना पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याऐवजी कमी दर सादर केलेल्या ठेकेदारांना काम देण्यात येणार आहे. या कामांसाठी 3 कोटी 39 लाख 17 हजार 216 रूपये खर्च होणार आहे. स्थायी समितीने या कामांना विनाचर्चा मान्यता दिली.
स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी (दि.27) पार पडली. अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. या सभेत सुमारे 75 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 27 नोव्हेंबरपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. तसेच, 1200 कोटी रुपयांची पाणी पुरवठा विषयक कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा बागुलबुआ उभा करुन कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. तसेच, कोट्यवधी रुपयांच्या निविदांचा बाजार मांडला जात असल्याचा आरोप जोर धरत आहे.
निगडी सेक्टर – 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिक व तांत्रिक विषयक देखभाल – दुरूस्तीची कामे तसेच स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. यांत्रिक व तांत्रिक विषयक देखभाल – दुरूस्तीच्या कामासाठी एस. आर. एंटरप्रायजेस स्थापत्य विषयक कामे आणि देखभाल-दुरूस्तीची कामे करण्यासाठी युनिक ट्रेडर्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा कमी दराची निविदा सादर केली. तर विविध केमिकल टाक्यांना आवश्यक सुरक्षा आवरण करून एजिटेटर सिस्टीम पुरविणे, ते कार्यान्वित करण्याचे काम केले जाणार आहे.
त्यासाठी 59 लाख 99 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी युनिक ट्रेडर्स या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 19.51 टक्के कमी दराने म्हणजेच 48 लाख 29 हजार रूपये दराची निविदा सादर केली. याशिवाय टप्पा दोनमध्ये फिल्टर बेडची वाळू बदलण्यात येणार आहे. तसेच सुरक्षा आवरण केले जाणार आहे. त्यासाठी 1 कोटी 90 लाख 30 हजार रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. दोन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी शिवम एंटरप्रायजेस या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 15.24 टक्के कमी दराने म्हणजेच 1 कोटी 61 लाख 40 हजार रूपये दराची निविदा सादर केली. 68 लाख रूपये रॉयल्टी चार्जेस धरून हा खर्च 1 कोटी 61 लाख रूपये खर्च होणार आहे. अशा या चार वेगवेगळ्या कामांसाठी 3 कोटी 39 लाख 17 हजार 216 रूपये खर्च होणार आहे. निविदेमध्ये स्पर्धा व्हाव्यात यासाठी किमान तीन ठेकेदारांनी स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक असतानाही या दोनपैकी एकाच ठेकेदाराला कोणतीही स्पर्धा न करता ही कामे देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
निविदांमध्ये संगनमत?
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, अधिकारी आणि ठेकेदारांमधील अर्थपूर्ण संगनमत या निविदा प्रक्रीयेतून उघड झाले आहे. एकाच ठिकाणच्या कामासाठी चार स्वतंत्र निविदा प्रक्रीया राबवून “रिंग’ करण्यात आल्याचा संशय आहे. केवळ दोनच ठेकेदारांनी निविदा सादर केल्याने निकोप स्पर्धेसाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. परंतु, ठेकेदारांबरोबरच स्वत:चे भले करून घेण्यासाठी या कामांना मान्यता देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप जोर धरत आहे.