पुसेसावळी गटातील पाणी समस्या वीस वर्षांत आमदारांना सोडवता आली नाही : घोरपडे

पुसेसावळी  – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना प्रत्येक भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. विरोधी उमेदवारांपेक्षा त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्याचा प्रत्यय काल पुसेसावळी भागातील शामगाव, राजाचे कुर्ले, गिरीजाशंकरवाडी, अंबेदरवाडी, पारगाव, गोरेगाव, रहाटणी, वडगाव, वंजारवाडी, पुसेसावळी आणि हजारमाची गणात आला.

या भागात मनोज घोरपडे यांच्या पदयात्रा व कोपरा सभा झाल्या. यावेळी “मनोजदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. मनोज घोरपडे म्हणाले, पुसेसावळी भागातील अनेक गावांमध्ये आजही शेतीच्या पाण्याची समस्या आहे. वीस वर्षे आमदार असलेल्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे अशा निष्क्रिय आमदाराला घरी बसवण्याची हीच योग्य वेळ आहे.

स्वयंघोषित कार्यसम्राट या भागात एकही उद्योग उभारू शकले नाहीत. बेरोजगार युवकांना पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागत आहे. मला मायबाप जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून आमदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मी या भागात गेल्या पाच वर्षांत अनेक कामे मार्गी लावली आहेत. यावेळी भागातील राजकीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.