पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्‍न पेटला

आंदोलने सुरू; हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी – पाणी कपातीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका अर्थहीन आणि चुकीची कारणे देत असल्याचे स्पष्ट करून शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांसह, नागरिकांचाही या निर्णयाला तीव्र विरोध वाढत चालला आहे. पाणी कपातीमुळे सोसायट्यांना खासगी टॅंकरद्वारे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली असून, सोसायट्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आंदोलन, रास्ता रोको यासारख्या मार्गाने नागरिक आपला रोष व्यक्त करीत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्‍न पेटल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

भोसरीत महिलांचा रास्ता रोको
पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्‍न पेटला आहे. मागील आठ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या भोसरीतील प्रभाग क्रमांक पाच महादेवनगर, सावंतनगर येथील महिलांनी (बुधवारी) रात्री आठ वाजता रस्ता रोको केला. मोठ्या संख्येने हंडा घेऊन महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी देखील महिलांनी केल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

समन्यायी पाणी वाटपासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. परंतु, एक दिवसाआड पाणी पुरवठा केला. तरी देखील तक्रारी कमी झाल्या नाहीत. पाण्याचा प्रश्‍न “जैसे थे’ आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या निर्णयाला विरोध वाढत आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केल्यापासून प्रभाग क्रमांक पाच मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. कमी वेळच पाणी येते. दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी येण्याची वेळ निश्‍चित नाही. रात्री-अपरात्री पाणी येत आहे. त्यामुळे नागरिक संतप्त आहेत. चिडलेल्या महिला रात्री आठ वाजता हंडा घेऊन रस्त्यावर उतरल्या व रास्ता रोको केला. त्यामुळे नगरसेवक, अधिकाऱ्यांची झोपच उडाली. स्थानिक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलांची समजूत काढली. त्यांनतर महिला रस्त्यावरून उठल्या आणि आंदोलन मागे घेतले.

पाणीकपात तातडीने मागे घ्या
मोशीतील चिखली मोशी चऱ्होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, एक दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक सोसायट्यांवर टॅंकरचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे आर्थिक गणित बिघडत आहे. पाणी पुरवठ्याचे ना हरकत प्रमाणपत्र देताना संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून हमीपत्र लिहून घेण्यात येते. परंतु, त्यानुसार कोणत्याही सोसायट्यांना बांधकाम व्यावसायिक त्यांच्या खर्चाने पाणी पुरवत नाहीत. याबाबत पालिकेकडे सातत्याने तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयाला फेडरेशनचा प्रखर विरोध आहे.

वास्तविक, हमीपत्र देणाऱ्या सर्व बांधकाम व्यावयासिकांवर कारवाई करून त्यांच्या स्वखर्चाने पाणी पुरवण्याचे आणि आजपर्यंतचे मागील सर्व पाण्यासाठी टॅंकरवर खर्च झालेले पैसे सोसायटीधारकांना देण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा, त्यांच्याकडील बांधकाम परवाने रद्द करावेत, अशी मागणी सोसायटी फेडरेशनने सचिव संजीवन इंगळे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.