नगर – जिल्ह्यातील प्रमुख धरणे भरुनही चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई अद्यापही दूर झालेली नाही. सप्टेंबर महिना निम्मा संपून गेलेला असतानाही जिल्ह्यात काही अपवाद वगळता कुठेही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पाणलोट क्षेत्रातील झालेल्याउ पावसामुळे जिल्ह्याची पावसाची आतापर्यंतची सरासरी 81.22 टक्के दाखवत असली तरी बहुतांश जिल्ह्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने तीव्र दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस पडून पाणी व चाराटंचाई निर्माण झाल्याने मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरु करावे लागले होते. टॅंकरची संख्या साडेसातशेच्यावर गेली होती. जुलैच्या अखेरच्या आठवड्यात पावसाचे आगमन झाले अन् टॅंकरची संख्या कमी होत गेली. मात्र, अजूनही कर्जत, जामखेड, पाथर्डी, पारनेर व काही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरु आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षी 13 सप्टेंबरपर्यंत अवघ्या 60.96 टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी पण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे ही टक्केवारी सप्टेंबरच्या मध्याला 81.22 टक्के झाली आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 216.37 टक्के पाऊस झाला. संगमनेर तालुक्यात 99.86 टक्के पावसाची नोंद झाली. कोपरगाव तालुक्यात 92.46 टक्के पाऊस झाला आहे.श्रीरामपूर तालुक्यात 71.63 टक्के पाऊस झाला आहे.
राहुरी तालुक्यात 71.63 टक्के पाऊस झाला आहे.नेवासे तालुक्यात 94.86 टक्के पावसाची नोंद झाली असून रहाता तालुक्यात 72.69 टक्के पाऊस झाला आहे. नगर शहर व तालुक्यात 74.58 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील सात तालुक्यांत अजूनही पावसाचे प्रमाण कमीच आहे. शेवगाव तालुक्यात 66.43 टक्के पावसाची नोंद झाली आहे.पाथर्डी तालुक्यात 66.09 टक्के, श्रीगोंदा तालुक्यात 69.55 टक्के पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस कर्जत तालुक्यात झाला आहे. यावर्षी कर्जत तालुक्यात आतापर्यंत केवळ 34.46 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी असली तरी पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या परिसरात व वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. सप्टेंबर महिना अर्धा संपत आला असला तरी जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरुच आहेत.