भर दुष्काळात रस्त्यावर पाणीच पाणी; नगरपालिकेचे दुर्लक्ष

नळ योजनेचा उडाला बोजवारा

श्रीगोंदा: शहराला वरदान ठरणारी तब्बल 50 कोटींची नळ योजना कार्यन्वित करण्यात आली आहे. मात्र नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात नळ योजनेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील मेन रोडवर रविवारी सकाळी फुटलेल्या पाईपलाइनमुळे भर दुष्काळात रस्त्याने जलाशयाचे रूप घेतले होते. दुष्काळात पाण्याला असलेले अनन्यसाधारण महत्व नगरपालिका प्रशासनाला कधी कळेल? हा प्रश्‍न नागरिकांनी यानिमित्ताने उपस्थित केला.
येथील कॅनरा बॅंकसमोर रविवारी दहा वाजण्याच्या सुमारास नवीन नळयोजनीची पाईपलाइन फुटली. वेळीच पाणीपुरवठा बंद न केल्याने लाखो लिटर पाणी काही वेळात वाया गेले. या रस्त्यावर दूरपर्यंत पाण्याचे डोह साचले होते. पावसाळ्यात पाणी साचते त्याप्रमाणे परिसरातील चित्र होते. काही वेळाने हे पाणी बंद करण्यात आले मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.

घोड धरणावरून शहरासाठी नळ योजना करण्यात आली आहे. घोड धरणात पाण्याची पातळी खालावलेली आहे. पाऊस लांबणीवर पडला तर शहरावर पाणी टंचाईची ढग येतील. या सर्व परिस्थितीचा करता नगरपालिकेने पाण्याच्या विषयी सतर्क व जागृक राहणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात शहरात ठिकठिकाणी पाईपलाइन फुटल्या यात हजारो लिटर पाणी वाया गेले. या गोष्टीत सुधारणा होण्याऐवजी प्रशासन सुस्त असल्याचा अनुभव शहरवासीयांनी रविवारी घेतला.


पाईपलाइन फुटायचे थांबता थांबेना

गेल्या काही दिवसांत नळ योजनेबाबत पालिका सतर्क नसल्याचे निदर्शनास आले. मेन रोडवर दोनदा पाईपलाइन फुटली. दिल्ली वेशी जवळ एकदा रस्त्यावर पाणी साचले. काळकाई चौकात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी खड्डा घेतला तेथील पाईपलाइन कॅप न लावल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर आले, आदी सर्व घटना काही दिवसांत एकामागे एक घडल्या. पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश नसल्याने भर दुष्काळात पाण्याची नासाडी होत असल्याची दुःखद भावना सुजाण नागरिकांनी दै. प्रभातशी बोलताना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.