शेवटच्या दिवशी प्रचारावर पाणी

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या मतदान, दिवाळीपूर्वीच फुटणार विजयी उमेदवारांचे फटाके
प्रशासन मतदानासाठी सज्ज

नगर – जिल्ह्यातील बारा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला तो पावसाच्या आगमनाने! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिण भागात पावसाने हजेरी लावल्याने उमेदवारांच्या प्रचारावर पाणी फे रले गेले. परवा म्हणजेच सोमवारी,दि.21 रोजी मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे. परवा मतदान झाल्यानंतर लगेचच गुरुवारी,दि.24 मतमोजणी होणार असल्याने दिवाळीआधीच विजयी उमेदवारांचे फ टाके फु टणार आहेत.

जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघात 18 लाख 7 हजार 853 पुरूष,तर 16 लाख 65 हजार 733 स्त्री व अन्य 157 असे एकूण 34 लाख 73 हजार 743 मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहे. यात 35 हजार नवे मतदार आहेत.तसेच पोस्टल मतांची संख्या 26664 असून 10258 सैनिकांचे मतदान आहे.

नगर जिल्ह्यात एकूण बारा मतदारसंघ असून त्यात 116 उमेदवार नशीब अजमावत आहेत.त्यासाठी एकूण 3722 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी,एक शिपाई व पोलिस असा कर्मचारी वर्ग नेमण्यात आलेला आहे.

यावेळी लोकसभेपेक्षाही अधिक कडक निर्बंध आचारसंहितेचे होते. त्यामुळे विविध परवानग्यांचे परवाने घेताना उमेदवार व खास करून त्यांच्या कार्यकर्त्यांची दमछाक झाली. वाहन परवाना,लाऊडस्पीकर,सभा,मेळावे,प्रचारकार्यालय,मिरवणूक,रोड शो,रॅली आदींच्या बारा मतदारसंघात अवघे 1320 परवाने मिळाले.

लोकशाहीचा हा सोहळा साजरा करण्यासाठी 26664 कर्मचारी कार्यरत आहेत.प्रत्यक्ष 22342 कर्मचारी नियुक्‍त असून अतिरिक्‍त 10 टक्‍के मिळून24584 व मतदान केंद्राच्या पारिसरात नियुक्‍त 1900 असे एकूण 26384 कर्मचारी आहेत. मतदानासाठीचे पहिले दोन प्रशिक्षण पूर्ण झाली असून उद्या मतदानाच्या आदल्या दिवशी तिसरे प्रशिक्षण होईल.त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना मतदानाची मतदान यंत्रांसह सर्व साधनसामुग्री घेवून नियुक्‍ती दिलेल्या गावी जावे लागेल. सोमवारी मतदानाच्या प्रक्रिया पार पाडल्यानंतर सर्व मतदान मशिने घेवून तालुक्‍याच्या मतमोजणीच्या ठिकाणी ते जमा करावे लागेल. त्यानंतर तीन दिवस मतमोजणीच्या स्थळी पोलीस बंदोबस्तात ही मतदान यंत्रे सुरक्षीत राहतील.

दृष्टीक्षेप…
एकूण मतदारसंघ-12
एकूण उमेदवार-116
एकूण मतदार-34,73,743
पुरूष मतदार-18,07,853
स्त्री मतदार-16,65,733
अन्य मतदार-157
पोस्टल मतदार-26664
सैनिक मतदार-10258
एकूण कर्मचारी-26664
क्षेत्रीय अधिकारी-375
पथके-38
स्टॅटिक एसएसटी टीम-36
व्हीडीओ सर्व्हिलॉन्स टीम-12
मतदान केंद्र-3722
सखी मतदान केंद्र-16
दिव्यांग मतदान केंद्र-10
वेब कास्टींग मतदान केंद्र-416
विविध परवाने-1320
मतदानयंत्रेः
बी.यु.-7000
सी.यु.-5230
व्ही.व्ही.पॅट-5450

Leave A Reply

Your email address will not be published.