कुठल्याही परवानगीशिवाय बसेस, थांब्यांवर सर्रास होणाऱ्या जाहिरातबाजीचा फटका
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) जाहिरातीच्या माध्यमातून मागील साडेपाच वर्षांत 49 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. मात्र, अनधिकृत जाहिरातदारांकडून कुठल्याही परवानगीशिवाय बसेस, थांब्यावर सर्रासपणे जाहिराती केल्या जातात. यामुळे प्रशासनाचा हक्काचा महसूल बुडत आहे. त्यांना अटकाव घालण्यासाठी प्रशासनाकडे यंत्रणा नसल्याचे दिसून येते.
पीएमपीएमएलतर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत बससेवा पुरविली जाते. यातून प्रशासनाला दररोज सुमारे दीड कोटी रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, इंधन, देखभाल दुुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे पगार आदींवर होणारा खर्च विचारात घेता खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी आहे. यामुळे प्रशासन अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी बसेस, बसथांबे आदींवर जाहिरात करून त्या माध्यमातून महसूल गोळा करते. याशिवाय, पीएमपीएमएल प्रशासनाच्या ताब्यातील डेपो, गाळे भाडेतत्वावर देण्यात येतात.
पीएमपीएमएल प्रशासनाकडून बसेसवर जाहिरात करण्यासाठी नियम व अटी घालून देण्यात आल्या आहेत. निविदा प्रसिद्ध करतानाच संबंधित ठेकेराला माहिती देण्यात येते. पुणे महानगर परिवहन महामंडाळाच्या ताफ्यात सुमारे 2 हजार बसेस आहेत. तर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत मिळून सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक बसथांबे आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून जाहिरात करण्यास परवानगी दिली जाते. या जाहिरातीच्या माध्यमातून प्रशासनाला महसूल मिळतो. ठेकेदारांना जाहिरातीचे कंत्राट दिल्यानंतर त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणावर ते जाहिरात करू शकतात. प्रशासनाकडून ताफ्यातील बसेस, बसथांबे, शेल्टर्स असे वर्गीकरण करून संबंधित ठिकाणी जाहिरात करण्यास परवानगी दिली जाते. या माध्यमातून प्रशासनाला मागील पाच वर्षांत मोठा महसूल प्राप्त झाला आहे.
जाहिरातीच्या माध्यमातून 49 कोटींचा महसूल
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेस आणि बसथांब्यांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींमुळे प्रशासनाच्या तिजोरीत वाढ झाली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून मागील साडेपाच वर्षांत प्रशासनाला तब्बल 49 कोटी 22 लाख 7 हजार 658 रुपये महसूल मिळाला आहे.