फूल उत्पादकांच्या कष्टांवर ‘पाणी’

आधी करोना आणि आता पावसामुळे फुलांचे आतोनात नुकसान


खराब फुले बाजारात दाखल होत असल्याने भावही निम्म्यापेक्षा कमी

पुणे – करोना आणि त्यानंतर पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी नवरात्र, दसरा आणि दिवाळीसाठी राखून ठेवलेली फुलांचे आतोनात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी फुलांचा तोडा केला होता. मात्र, यातील फुले मोठ्या संख्येने खराब झाली आहेत. मुळातच मंदिर बंद असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत फुलांची उलाढाल कमी होत आहे. भावही निम्म्यापेक्षा कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

शेवतीच्या भिजलेल्या फुलांना 50 ते 100 रुपये भाव मिळत आहे. तर, कोरड्या आणि चांगल्या प्रतिच्या मालाला 150 ते 250 रुपये भाव मिळत आहे. झेंडूच्या फुलांना 20 ते 80 रुपये भाव मिळत असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

दरवर्षी घटस्थापनेच्या आदल्या दिवशी फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे भावही वाढत असतात. मात्र, यंदा साध्या पद्धतीने घटस्थापना होणार असल्याने फुलांना मागणी कमीच आहे. किरकोळ बाजारातही नेहमीच्या तुलनेत ग्राहकांची संख्याही कमी आहे. त्यात हलक्‍या फुलांचे प्रमाण अधिक असल्याने भावही वाढलेले नाहीत. यवत, माळशिरस, नगर, सातारा येथून फुलांची आवक झाल्याचेही भोसले यांनी सांगितले.

जुईचे भाव गगनाला
नवरात्रोत्सव जरी साध्या पद्धतीने साजरा होणार असला तरीही जुईच्या फुलांना मागणी कायम आहे. घाऊक बाजारात शुक्रवारी एका किलोला 1400 ते 1600 रुपये भाव मिळाला. आळंदी आणि तळेगाव परिसरातून जुईच्या फुलांची बाजारात आवक झाली आहे. तसेच घटासाठी विड्याच्या पानाचा तसेच तिळाच्या फुलांचा मान असल्याने विड्याची पाने आणि तिळाच्या फुलांचे भाव तेजीत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.