पर्वती जलकेंद्रात बिघाड; टॅंकरभोवती नागरिकांचा घोळका
पुणे – पर्वती जलकेंद्रात गुरुवारी पहाटे बिघाड झाल्याने केंद्रांतर्गत येणाऱ्या परिसरात पालिकेकडून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. करोनाचे संकट असतानाही नागरिकांनी जीव धोक्यात घालीत पाणी भरण्यासाठी टॅंकरभोवती एकच घोळका केला.
पर्वती जलकेंद्रातून सगळ्या पेठा, शिवदर्शन, लक्ष्मीनगर, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पद्मावती, सहकारनगर, चव्हाणनगर, संभाजीनगर, तळजाई, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, महर्षीनगर या परिसराला पाणीपुरवठा केला जातो. यातील दाट वस्ती असलेल्या भागात करोनाचा संसर्ग वाढला आहे.
त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने पाण्याची आवश्यकता असतानाच गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास पर्वती जलकेंद्रात बिघाड झाल्याने पाणी येऊ शकले नाही, त्यामुळे नागरिकांची आलेल्या टॅंकरवर करोना सुरक्षिततेचे सर्व नियम पायदळी तुडवीत घोळका केला.