पुणेकरांवर पाणी ‘विघ्न’

शहराला मिळणार साडेअकरा टीएमसी पाणी


करार करण्यास स्थायी समितीची मान्यता

पुणे – विघ्नहर्ता गणरायाला निरोप देऊन काहीच तास लोटले असताना; पुणेकरांवर पुढील वर्षभरासाठी पाण्याचे विघ्न ओढावले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागात पुढील सहा वर्षांसाठी 11.50 टीएमसी पाण्याचाच करार होणार आहे. याचे अधिकार आयुक्त सौरभ राव यांना देण्यास महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेत मान्यता देण्यात आली. त्यामुळे पुणेकरांना वाढीव पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून सुधारित कराराची अंमलबजावणी झाल्यास ऐन दिवाळीत आणि पुढे उन्हाळ्यात पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

यापूर्वीचा करार दि.28 फेब्रुवारी 2019 ला संपुष्टात आला. मात्र, हे पाणी कमी पडत असून शहराची लोकसंख्या 52 लाखांवर गेल्याने 17 टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे. मात्र, शासनाकडून त्यावर निर्णय न झाल्याने पालिकेने पाटबंधारे विभागाला विनंती करत हा करार 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सहा महिने वाढीव मुदत देण्याची मागणी केली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही शासनाकडून पालिकेचा पाणीकोटा वाढविण्यात आलेला नाही. तसेच पाटबंधारे विभागाने 31 ऑगस्टनंतर पाण्याची दुप्पट दराने आकारणी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे करार करण्यासाठी पत्र दिले होते. त्यानुसार पाटबंधारे विभागाने कराराचा मसुदा पाठविला असून त्यात सप्टेंबर 2019 पासून पुढे सहा वर्षे करार करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यात पालिकेसाठी 11.50 टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेने मुंढवा जॅकवेलमधून स्वखर्चाने वर्षाला 6.50 टीएमसी पाणी बेबी कालव्याद्वारे पाटबंधारे विभागास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वाढीव कोट्याचा दिलासा
दरम्यान, हा करार करताना राज्यशासनास महापालिकेने मागणी केल्यानुसार वाढीव पाणी कोटा मिळाल्यानंतर सुधारित करार करण्याची मुभाही महापालिका या करारात करून घेणार आहे. तर शासनाने निश्‍चित केलेले सुधारित पाण्याचे दर तसेच वाढीव कोटा मंजूर झाल्यास नवीन करार करण्याचा अधिकारही आयुक्तांना देण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास जुनाच पाणीकोटा मंजूर होणार असला, तरी शासनाच्या निर्णयावर पुणेकरांचे वाढीव पाणी अवलंबून असणार आहे.

काय आहे सद्यस्थिती
महापालिकेने राज्यशासनाकडे सादर केलेल्या वाढीव कोटयानुसार, शहराची लोकसंख्या 52 लाख गृहीत धरण्यात आली आहे. या लोकसंख्येला पाण्याच्या मानकानुसार, दरडोई 152 लिटर पाणी द्यायचे असल्यास महापालिकेस वर्षाला 17 टीएमसी पाण्याची आवश्‍यकता आहे. तर दिवशी शहराला एक वेळ पाणी देण्यासाठी महापालिकेस 1450 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, सद्य स्थिती शहराला 1,350 एमएलडी पाणीच मिळत आहे. मात्र, पुन्हा 11.50 एमएलडी पाण्याचा करार झाल्यास महापालिकेस प्रतीदिन 982 एमएलडीच पाणी मिळेल. तर त्यापेक्षा जादा पाणी घेतल्यास दुप्पट दराने उर्वरीत 300 एमएलडीचे कोट्यवधी रुपये वाढीव कोटा मंजूर होईपर्यंत भरावे लागतील.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×