पुणे – ई-फेरफार प्रकल्पांतर्गत राज्यातील सातबारा उतारा व 8-अ उतारा संगणकीकृत करण्यात आले. नागरिकांना माहितीसाठी असलेल्या सातबाऱ्याचा गैरवापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे तलाठी, महा-ई-सेवा केंद्रातून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सातबारा व 8 अ उताऱ्यावर पुण्यातील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने तयार केलेला लोगो (वॉटर मार्क) असणार आहे. लोगो असलेला उताराच शासकीय कामांसाठी ग्राह्य धरला जाणार आहे.
राज्यामध्ये ऑनलाइन फेरफाराची अंमलबजावणी सुरू झालेल्या तालुक्यांमधील अधिकार अभिलेख (गाव नमुना नंबर सात बारा व आठ अ उतारा) नागरिकांना दिसण्यासाठी नवीन अद्यावत संकेतस्थळ विकसित केले आहे.
ई-फेरफार प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये तालुकानिहाय सातबारा उताराचा डाटा स्टेट डेटा सेंटरवर स्थापित करण्याचे काम सुरू आहे. डेटा ऑनलाइन अद्यावत झाल्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार अभिलेखाच्या नकला सेतू केंद्रातून तसेच तलाठ्याकडील लॅपटॉपद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यावर शासनाचा लोगो व ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो मध्यभागी वापरण्यास परवानगी दिली आहे.