पाणीच पाणी चहुकडे…

यावर्षी उन्हाळ्यानं कहर केला अगदी असं म्हणत एप्रिल-मे महिन्याचे आणि जूनचे काही दिवस काढले आणि खूपच प्रतिक्षेत असलेला तो “पहिला पाऊस’ एके दिवशी अचानक आला देखील. सारी सृष्टी मोहरली, उन्हाळ्याच्या तीव्र चटक्‍यांनी हैराण झालेली धरती आणि माणसेसुद्धा ते टपोरे थेंब झेलण्यासाठी आतुरली. मृद्‌गंध पसरला आणि साऱ्या अत्तराच्या बाटल्या त्यापुढे फिक्‍या पडल्या. झाडे तरारले, वृक्ष-वेली डोलू लागले. रस्ते पाण्याने स्वच्छ झाले. रेनकोट आणि छत्र्यांनी कपाटातून बाहेर पडून पावसाचे स्वागत केले.

ज्येष्ठांनी घरात बसून चहा आणि भज्यांचा आस्वाद घेतला. तरुण-तरुणींनी पावसात भिजत प्रेमाच्या आणा भाका घेतल्या. पावसावर कवितांची बरसात झाली. कवीसंमेलने भरली आणि अशा रीतीने दरवर्षीप्रमाणे पावसाचे जोरदार स्वागत झाले.

स्वागत झाले खरे आणि मग तो पडतच राहिला. सतत, नियमित, मुसळधार आणि भिजवणारा. मग नद्या भरल्या, ओढे भरले. हळूहळू धरणेही भरली. वेधशाळेच्या अंदाजाकडे रोज लक्ष जाऊ लागले. पुढील काही दिवस सतत कोसळणारी ही भाकिते खरी होऊ लागली. इतकी की, भोलानाथाला बालचमूंनी केलेली विनवणी खरी झाली. शाळेभोवती तळं साचून शाळा दोन दिवस बंध ठेवाव्या लागल्या. तरी पावसाचा जोर काही संपला नाही. जनजीवन विस्कळीत, नदी काठावरील लोकाचे स्थलांतर,वाहतुकीची झालेली कोंडी यांनी वर्तमानपत्रोंच मथळे भरले जाऊ लागले.

पण एवढ्यावरचं त्याचे समाधान झाले नाही. तो पडत राहिला. आणि गावेच्या गावे पाण्याने भरून गेली. सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, बेळगाव यांना पुराच्या पाण्याने वेढले. सार गाव पाण्यात गेलं. लोक घरे सोडून बाहेर पडले. पण जाणार कुठे? मदत कार्य पोहोचेपर्यंत अनेक जण पाण्यात वाहून गेले. पै-पै करून जमविलेला संसार जीवाच्या भीतीने लोक जिथे मिळेल तेथे आश्रय मिळेल तेथे गेले.

आपत्ती निवारणच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त केली. अनेकांचे प्राण वाचवले. यात अगदी तान्हुल्यांपासून तरुण स्त्री, पुरुष. वयस्कर, गरोदर महिला, अपंग साऱ्यांचाच समावेश होता. बोटीतून बचावकार्य चालू असताना बोटच उलटल्याने अनेकांचे प्राण गेले. डोळ्यादेखत आपले नातेवाईक वाहून जाताना अनेकांनी पाहिले. सर्वत्र हाहाकार उडाला. ज्यांना या पुराचा खरंच फटका बसला आहे त्यांची आयुष्ये उद्‌ध्वस्त झाली आहेत.

आपण नुसते टी व्हीवर बातम्या ऐकतो, पाहतो पण प्रत्यक्ष फार मोठी हानी झाली आहे. कुणाला मदत मिळेल किंवा नाही पण गेलेल्या माणसांचं काय? कसा हा निसर्गाचा चमत्कार आहे. इकडे पाणीच पाणी चहूकडे अशी स्थिती आहे तर तिकडे एका भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग चालू आहेत. पण शेवटी निसर्ग ही शक्‍ती आहे. तिच्यापुढे माणसाची शरणागती होते. एका पोथीमध्ये एक ओवी आहे की
पिके पाण्यापासुनी
येती जरी जगामधे ।
तरी पाडणे पाणी
मानवाच्या न करी जाणी ।।

खरचं पडणारे पाणी थांबविणे तरी शक्‍य आहे का? का पाणी पाडणे शक्‍य आहे.
हे ऋतुचक्र आहे आणि ते चालविणे आपले काम नाही. उन्हाळा खूप झाला, म्हणून आपण एसी खरेदी करू शकतो. पावसात छत्री, रेनकोट वापरून आपलं संरक्षण करू शकतो पण या अदृष्य शक्‍तीपुढे खरंच…
पराधिन आहे जगती
पुत्र मानवाचा
दोष ना कुणाचा…

– आरती मोने

Leave A Reply

Your email address will not be published.