पाण्याला पर्याय नाही त्यामुळे जपून वापरा

कार्यकारी अभियंता रामदास ताबे यांचे आवाहन

पिंपरी: गेल्या दहा वर्षात शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. मात्र पाण्याचा कोटा वाढवून मिळालेला नाही. भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून पाणी उपलब्ध होण्यास आणखी दोन ते तीन वर्षाचा कालावधी आहे. पाण्याला पर्याय नाही त्यामुळे मिळत असलेले पाणी जपून वापरा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.

केशवनगर, चिंचवडगाव येथील सोनिगरा टाऊनशीप मधील रहिवाशांनी आयोजित केलेल्या रहिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, सोनिगरा टाऊनशिपमधील प्रशांत जमादार, नुपूर जोशी, महेश पिंपळे, युवराज शिंदे यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना तांबे म्हणाले, “”महापालिका प्रती व्यक्‍ती 135 लिटर पाणी देते. राज्यात इतर महापालिका अशा प्रकारे मुबलक पाणी देत नाही. गेल्या दहा वर्षात पवना धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या कोट्यात शासनाने वाढ करून दिलेली नाही. भामा आसखेड आणि आंद्रा धरणातून 267 टीएमसी पाण्याचा कोटा शहरासाठी मंजूर केला आहे. मात्र हे पाणी मिळण्यासाठी जी यंत्रणा उभारावी लागेल, त्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागेल. मात्र नागरिकांनी मिळत असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे”, असे सांगत तांबे यांनी नागरिकांना पाणी बचतीचे विविध उपाय सांगितले.

“सोनिगरा टाऊनशीपमध्ये दिवाळीमध्ये चोरीची घटना घडली. सुरक्षा रक्षक व सीसीटिव्ही कॅमेरे असूनही ही घटना घडल्याने येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. तसेच येथील नागरिकांना पाण्याची समस्याही होती. त्यामुळे पाणी आणि सुरक्षा याबाबत नागरिकांचा मेळावा घेतला. अशा प्रकारे चिंचवडमधील विविध सोसायट्यांमध्ये उपक्रम राबविण्यात येणार आहे.”
-राजेंद्र गावडे, स्थानिक नगरसेवक 

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक खुळे म्हणाले, “”मोटार तसेच सदनिकेला नागरिकांनी एकापेक्षा अधिक टाळे लावणे गरजेचे आहे. घरातील कपाटात दागिने न ठेवता इतर ठिकाणी ठेवावेत. कारण चोरट्याला कमीत कमी वेळेत चोरी करायची असल्याने तो इतर ठिकाणी शोधत बसत वेळ वाया घालवत नाही. दागिने ठेवण्यासाठी बॅंकेतील लॉकर सर्वात सुरक्षित जागा आहे. सर्वांनी सेफ्टी डोअर बसवावे मात्र त्यास बाहेरून कडी कोयंडा लावू नये. त्यामुळे आपण घरात आहोत की नाही हे चोरट्याला कळत नाही. तसेच सोसायटीत येणाऱ्या दुधवाल्यापासून ते पाहूण्यांपर्यंत सर्वांची नोंद ठेवावी.” असे सांगत सुरक्षा विषयक विविध उपाययोजना त्यांनी सांगितल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.