मोरया गोसावी मंदिरात पाणी

पिंपरी  – गुरुवार सकाळपर्यंत जराही उसंत न घेता बरसणाऱ्या मेघराजाने पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक परिसर जलमय केले. महिनाभरापूर्वी कोरडे पडलेले पवनेचे नदीपात्र दुथडी भरुन वाहत आहे. बंधाऱ्यांवरुन देखील पाणी जाऊ लागले आहे. पिंपरी-भाटनगर, संजय गांधीनगर येथील काही झोपड्यांजवळ आणि सांगवी-मुळानगर येथील झोपड्यांशेजारी गुरुवारी पावसाचे पाणी आले होते. तर, चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिरातही पाणीच पाणी झाले होते. मंदिरात पहाटे शिरलेले पाणी गुरुवारी दुपारी ओसरले.

गेल्या काही दिवसांपासून पवना धरण क्षेत्रात आणि पिंपरी-चिंचवड भागातही पावसाचा जोर कायम आहे. काल रात्री झालेल्या संततधार पावसामुळे आज पहाटेपासूनच पवना नदी दुथडी भरून वाहत होती. भाटनगर, संजय गांधीनगर तसेच मुळानगर येथील झोपड्या या नदीपात्रालगत आहेत. या झोपड्यांजवळ पावसाचे पाणी आले होते.

पवना धरण क्षेत्राखालील भागामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे पवना नदीची पातळी वाढली होती. पवना नदीचे पाणी पहाटेच्या सुमारास चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरात शिरले. त्यामुळे मंदिराचा परिसर जलमय होऊन गेला होतात. दुपारनंतर पाणी हळू-हळू ओसरू लागले. दरम्यान, गुरूवारी सकाळपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे पवना नदीतील पाण्याची पातळी नियंत्रणात राहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.