निर्यातबंदीने कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

आधी करोनाने, आता केंद्राच्या निर्णयाने अर्थकारण कोलमडले

लाखणगाव -शेतकऱ्यांनी दोन-तीन हजार रुपये किलो या दराने कांद्याचे बियाणे खरेदी करून कांदा लागवड केली. मजुरी, भांडवली खर्च, खते, औषधे त्याचप्रमाणे कांदाचाळी उभारून शेतकऱ्यांनी हा कांदा चाळीत ठेवला. मात्र, करोनामुळे सर्वच पिके कवडीमोल भावाने त्याला विकावी लागली.

या पिकातून त्याच्या हाती काहीच आले नाही. कांद्याचे बाजारभाव मागील आठ ते पंधरा दिवसांत वाढू लागले होते, त्यामुळे साठवलेला कांदा विकृन इतर पिकात झालेला आर्थिक तोटा भरून येईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

केंद्र सरकारने सोमवारी (दि. 14) सायंकाळी कांद्याची निर्यात बंद केली, त्यामुळे परदेशात विक्रीसाठी जाणारा सर्व कांदा थांबला. त्याचा परिणाम कांद्याच्या विक्री वर होऊन मागणीत घट होणार आहे. सोमवारी (दि. 14) उत्तम प्रतीच्या गोळा कांद्यास 27 रुपये किलोप्रमाणे भाव होता. निर्यात बंदीमुळे मंगळवारी (दि. 15) तोच कांदा 24 रुपयाने विकला गेला.मध्यम गुलटी, भुगी या कांद्याचे भाव तर खूपच कमी झाले आहेत.

केंद्राच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कांदा हा देशात विकावा लागणार आहे. कांद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन रुपये मिळत असतानाच या पैशाला ब्रेक लागला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सूर आहे.
– बाळासाहेब बाणखेले, संचालक, कृषी उत्पन्न बाजार, मंचर

मागील आठ दिवसांपासून कांद्याचे वाढू लागल्याने शेतकऱ्यांना थोडे फार पैसे मिळू लागते होते; परंतु निर्यात बंदीमुळे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकरी केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराज असून शेतकरी कांदा निर्यातीबाबत आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
– देवदत्त निकम,
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर

Leave A Reply

Your email address will not be published.