कोथरूड डेपोच्या डिझेल टाकीत पाणी

पीएमपीच्या 19 बसेस बंद, प्रवाशांची तारांबळ

पुणे – पीएमपीच्या कोथरूड डेपोतील डिझेल टाकीचा चेंबर नादुरुस्त झाल्याने पावसाचे पाणी शिरल्याचा प्रकार शनिवारी समोर आला. हे पाणीमिश्रित डिझेल शुक्रवारी रात्री पीएमपीच्या काही बसेसमध्ये भरल्याने शनिवारी सकाळी संचलनासाठी निघालेल्या सुमारे 19 बस बंद पडल्या. परिणामी, प्रवाशांची तारांबळ उडाली.

पीएमपीचे शहरात 13 डेपो आहेत. प्रत्येक डेपोमध्ये स्वतंत्र डिझेल टाकी आहे. यातील कोथरुड डेपोतील डिझेल टाकीच्या चेंबरमधून आतमध्ये पाणी शिरले. हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या लक्षात न आल्याने हे डिझेल शुक्रवारी काही बसेसमध्ये भरण्यात आले. ही टाकी सुमारे 10 हजार लिटर क्षमतेची असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी एका कर्मचाऱ्याने बस सुरू केली असता ती बंद पडली. यानंतर आणखी काही बसेस बंद पडल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. यानंतर, पाहणी केली असता पाणी शिरल्याचे लक्षात आले. सुमारे 19 बसेसमध्ये पाणीमिश्रित डिझेल भरण्यात आले.

कोथरूड डेपोतील या प्रकारानंतर पेट्रोलियम कंपनीला कळविण्यात आले असून त्यांच्याकडून दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे शहरातील काही बसेसवर परिणाम झाला आहे. मात्र, इतर डेपोतून बसेस उपलब्ध करून फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या.

– सुभाष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.