पाणीसमस्येचे संकट अधिक ‘तीव्र’

कपातीमुळे शहरातील नागरिक त्रस्त : प्रशासनाचे प्रयत्न निरुपयोगी, अयशस्वी

– प्रकाश गायकर

पिंपरी – यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस सरासरी ओलांडत धुवाधार बरसला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण शंभर टक्के भरले. सद्यस्थितीत ऑगस्ट 2020 पर्यंत पाणी पुरेल एवढा पाणीसाठा धरणामध्ये उपलब्ध आहे. मात्र पाणीसाठा उपलब्ध असतानाही 27 लाख लोकसंख्या असलेल्या शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यामुळे शंभर टक्के भरलेले धरण उशाला असूनही पिंपरी-चिंचवडकर तहानलेलेच आहेत.

गेल्या दहा वर्षामध्ये शहराचा विकास झपाट्याने होत आहे. वाढत्या कारखानदारीसह शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनाची कसोटी पणाला लागली आहे. पाणी वितरण प्रणालीनुसार दरमाणसी 135 लिटर पाणी मिळावे अशी अपेक्षा आहे. मात्र पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. समान पद्धतीने पाणीपुरवठा करता यावा, शहरातील पाणी गळती रोखली जावी यासाठी पाणीकपात करत असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 25 नोव्हेंबरला स्पष्ट केले. मात्र यामध्ये सुधारणा होत नसल्याने नागरिकांनी पाणी कपातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शहरामध्ये नवीन उद्योग-धंद्यांची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. 2015-16 मध्ये प्रतिदिन 420 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत होता. 2018-19 मध्ये 420 दसलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात आहे. यासोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 30 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठ्यामध्ये वाढ करूनही शहराला समान पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या गंभीर बनली आहे.

पाणी गळतीने पाणीसमस्या डोईजड
शहरातील जलवाहिन्या 30 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक ठिकाणी छोटे-मोठे लीकेज असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. पाणी गळती रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्काडा प्रणाली अंमलात आणली. मात्र या प्रणालीचा गळती रोखण्यासाठी काहीच उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. 40 टक्‍यांहून जास्त पाणीगळती होत असल्याने सुमारे 180 एमलडी पाणी वाया जाते. तसेच गळती होत असल्याने जलशुद्धीकऱण केंद्राच्या सुरुवातीच्या भागामध्ये जादा दाबाने तर शेवटी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यासाठी पाणीकपात करून दिवसाआड जास्त दाबाने एक-एका भागात पाणीपुरवठा करणे हाच योग्य पर्याय असल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे.

काय आहे स्काडा प्रणाली
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांपर्यंत शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी संगणकीकृत स्काडा प्रणाली अमंलात आणली. नदीतील अशुद्ध पाणी घेऊन ते जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुद्ध करण्यापासून नागरिकांच्या घरी पोहचविण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया व नियंत्रण संगणकीय प्रणालीद्वारे केले जाते. त्यासाठी महापालिकेतर्फे नियंत्रण कक्ष, पाण्याच्या टाक्‍या या ठिकाणी सेन्सर बसविण्यात आले. ज्यामधून किती पाणी उपलब्ध आहे. पाण्याच्या दाब किती प्रमाणात आहे. किती पाणी सोडायचे आहे या गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र सद्यस्थितीत या स्काडा प्रणीलाचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे चित्र शहरात आहे.

24 बाय 7 चा बोजवारा
शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन 2045 पर्यंतच्या पाणीपुरवठ्यावर विचार करण्यात आला. त्यासाठी केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम अंतर्गत 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शहरामध्ये या अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात गळती होत असलेले पाइप बदलणे, मीटर बसविणे व गळती होत असलेले पाइप बदलणे अशी कामे हातात घेण्यात आली. त्यापैकी अनेक ठिकाणची कामे पूर्ण होऊनही पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले नाही. त्याचप्रमाणे हा प्रयोग 2019 पर्यंत संपूर्ण शहरात राबविला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात वर्षाअखेरीस 50 टक्केही काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना दाखवलेल्या 24 बाय 7 पाणीपुरवठ्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here