-रुग्णांना त्रास ः पाणी झिरपत असल्याने उपचारात अडथळे
-संत तुकारामनगर : वायसीएम रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागातील छताची गळतीमुळे झालेली दुरावस्था.
पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आंतररुग्ण विभागामध्ये पाणी गळती होत आहे. या विभागात तातडीने आणलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, छतावरील भिंतीतून पाणी गळत असल्याने रुग्णांवर उपचार करताना अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे, संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
शहरातील वायसीएम रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातून नागरीक उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयातील गैरसोयीने नागरिकांचे हाल सुरु आहेत. या ठिकाणी अस्थिरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, दंतरोग असे आठ प्रकारचे विभाग उपलब्ध आहेत. आंतररुग्ण विभागामध्ये रात्री-अपरात्री तातडीचे रुग्ण आणले जातात. मात्र, पाऊस सुरु झाल्यानंतर या विभागाच्या छतामधून पावसाचे पाणी झिरपत असल्याचे चित्र दिसत आहे. रुग्णालयातील ज्या ठिकाणी पाणी झिरपते त्या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यात येते. त्यामुळे रुग्णांसह डॉक्टरांचीही मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. झिरपणाऱ्या पाणी साचून राहण्यासाठी खाली कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. विभागातील अंतर्गत अनेक ठिकाणी गळती होत असल्याने येथील फरशीवर कायम पाणी साचलेले असते, परिणामी फरशीवरुन घसरुन अपघात होण्याची शक्यता आहे.
आंतररुग्ण विभागात रोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि नातेवाईकांची गर्दी असते. या ठिकाणी गंभीर स्थितीतील रुग्णांवर उपचार केले जात असल्याने सुविधा मिळण्याची गरज आहे. मात्र, अंतर्गत विभागात पाणी गळती होत असल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लवकरात-लवकर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.