उजनी धरणातील पाणीसाठा वजा 50 टक्के

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने खलावला असून प्रकल्पाची पातळी वजा 50 टक्के झाली आहे. मृतसाठ्यातील जवळपास 27 टीएमसीहून अधिक पाणी संपले आहे. सध्या धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उजनी धरण 2018 च्या पावसाळा हंगामात क्षमतेने म्हणजे 111 टक्के भरले होते. मात्र पावसाने सोलापूर जिल्ह्यात हात आखडता घेतल्याने ऑगस्ट महिन्यापासूनच सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडावे लागत होते. यामुळे उजनीची अवस्था उन्हाळा येता येता बिकट झाली. मागील महिन्यापासून धरण वजा पातळीत आले आहे. यातच आता सोलापूरसह भीमा काठच्या गावांसाठी धरणातून पाणी सोडले जात असल्याने मागील धरण जवळपास दहा टक्के खालावले आहे.

शुक्रवारी सकाळी उजनी वजा 48.81 टक्के होती तर सायंकाळपर्यंत ती वजा 49.50 टक्के झाली होती. आता या प्रकल्पाने मायनसमध्ये पन्नाशी गाठली आहे. सध्या उन्हाचा प्रकोप ही वाढत असून रोज किमान साडेसात मिलीमीटर इतके बाष्पीभवन होत असल्याचे दिसत आहे. या प्रकल्पाच्या मृतसाठ्यात सध्या 1062 दशलक्ष घममीटर इतका पाणीसाठा शिल्लक असून तो 37 टीएमसी इतका होता. या हंगामात धरण वजा पन्नास टक्के झाले असून मृतसाठ्यातील 27 टीएमसी पाणी संपले आहे. आता पाणलोट व लाभक्षेत्राचे लक्ष पावसाकडे लागले आहे. यंदा उजनी क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.