अवसरी खुर्द शाळेत पाणी शिरले

मंचर -अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुसळधार पावसाचे पाणी वर्गखोल्यामध्ये घुसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली. पालकांनी शुक्रवारी (दि. 28) सकाळी शाळेत जाऊन गावपुढाऱ्यांना शाळेच्या दुरवस्थेबद्दल जाब विचारला. पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. अखेर गटशिक्षण अधिकारी पोपट महाजन यांच्या मध्यस्थीनंतर पालकांनी मुलांना शाळेत पाठविले.

नेत्यांचा दुटप्पीपणा
जिल्हा परिषदेच्या वतीने अवसरी खुर्द शाळेच्या वर्गखोल्यांसाठी 22 लाखांचा निधी मंजूर झाला होता. बांधकामासाठी स्टील, वाळु, खडी आणली होती, परंतु गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या दुटप्पी धोरणामुळे निधी परत गेल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत टेमकर यांनी केला आहे. 

अवसरी खुर्द येथील एसटी स्टॅंड ते बॅंक ऑफ बडोदा दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे नसल्याने पावसाचे पाणी मराठी शाळेच्या मैदानात घुसले. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे मैदानातील पावसाचे पाणी वर्गखोल्यांमध्ये गेल्याने विद्यार्थी घाबरुन गेले होते. सर्व वर्गखोल्यामध्ये पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असणाऱ्या बेंचचा काही भाग पाण्यात बुडाला होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची दफ्तरे पाण्याने भिजली होती. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी दफ्तरे वर्गातच ठेऊन घरी गेले. शाळेची कौले फुटल्याने विद्यार्थ्यांचा पोषण आहाराचा तांदुळ पाण्याने भिजून गेला.

सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेला पालक विद्यार्थ्यांना घरी नेण्यासाठी शाळेत आले असता त्यांना पाण्यातून वाट काढावी लागली. शुक्रवारी (दि. 28) सकाळी नऊपर्यंत वर्ग खोल्यांमध्ये पाणी साचून होते.वर्गखोल्या आणि एकंदरीत शाळेच्या इमारतीची झालेली दुरवस्था पाहुन पालक संतप्त झाले. पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु गटशिक्षण अधिकारी पोपट महाजन यांनी पालकांना विनंती केल्यानतंर जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेत विद्यार्थ्यांना पाठविले.

शुक्रवारी सकाळी पंचायत समितीचे सदस्य संतोष भोर, जिल्हा परिषदेच्या सदस्या अरुणा थोरात, राज्य जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, उद्योजक प्रशांत अभंग, सरपंच संगीता शिंदे, ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश टेमकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंत टेमकर, सचिन ढोणे, धो. स. शिंदे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.

यावेळी शाळेची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने निधी देण्याचे आश्‍वासन जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात आणि पंचायत समितीचे सदस्य संतोष भोर यांनी दिले आहे. दोन जेसीबीच्या सहाय्याने एसटी स्टॅंड परिसरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचे गटार काढणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य निलेश टेमकर यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.