मुरगूड नगरपालिकेत “पाणीबाणी’

पाणीप्रश्‍नी 16 नगरसेवकांनी दिले राजीनामे
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्‍यातील मुरगूड शहरास गेले अनेक दिवस दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. दुषित पाणी पुरवठाप्रश्‍नी जनतेकडून नगरपालिका प्रशासनाला जागे करण्याचे काम करण्यात आले होते. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने आज नगरपालिकेत पाणी प्रश्‍नी आणीबाणीच झाली. सत्तारूढ शिवसेना (मंडलिक गट) तसेच विरोधी पक्ष नेत्यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. हे राजीनामे प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे पाठवण्यात आले. पाणीप्रश्‍नासाठी तब्बल 16 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
मुरगूड शहराला सरपिराजीराव तलावामधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसमधील ब्लोरींग मशिन दीड ते दोन वर्षे बंद अवस्थेत असल्याने शहरास दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजनाच बिनकामाची ठरत आहे. या शहरास होणाऱ्या दुषित पाणी पुरवठा प्रश्‍नी नागरिकांनी वारंवार नगरपालिका प्रशासनास सोशल मीडिया आणि प्रत्यक्षात भेटून चर्चा झाली. पण याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले.

सत्तारुढ नगरसेवकांसह विरोधी नगरसेवक आणि सामान्य जनता नगरपालिका कार्यालयासमोर मोर्चा काढून जमा झाले आणि स्वच्छ पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. याप्रसंगी संतप्त नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांना व मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना त्यांच्या दालनातून बाहेर काढले. तसेच उपनगराध्यक्ष मेंडके यांच्याही दालनास कुलूप लावण्यात आले.

यावेळी नगरपालिकेच्या मुख्य दरवाजाजवळ थांबून नागरिक आणि नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजी केली. शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष राजेखान जमादार, मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना या दुषित पाणीप्रश्‍नावर चांगलेच धारेवर धरले. सध्या मुरगूड नगरपालिकेवर मंडलिक गटाची सत्ता आहे. येथे नगराध्यक्षासह 16 नगरसेवक – नगरसेविका मंडलिक गटाच्या आहेत. तर उर्वरित तीन पैकी दोन नगरसेवक आमदार हसन मुश्रीफ गटाचे व पाटील गटाचा एक नगरसेवक आहे. नगराध्यक्ष राजेखान जमादार हे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत. एकुण पाणी प्रश्‍नावरून 16 नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने गोंधळ उडाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.