बारामती – येथील शाळांमधून “वॉटर बेलदचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पंचायत समितीच्या वतीने सर्व शाळांमधून दररोज तीनदा पाणी पिण्यासाठी घंटा वाजविण्याचा म्हणजेच “वॉटर बेल’चा उपक्रम सोमवार (दि. 2) पासून सुरू करण्यात आला. याबरोबरच मुलांना शालेय पोषण आहारासोबतच गूळ व शेंगदाणे वाटपासही प्रारंभ करण्यात आला आहे.
ढवाणवस्ती शाळेत गटविकास अधिकारी प्रमोद काळे, गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रमुख संगीता ढवाण पाटील, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल जोरी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. मुलांमध्ये पाणी पिण्याची कमतरता असते, अभ्यासामुळे वेळेत पाणी न जाण्याने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, ही बाब विचारात घेत बारामती तालुक्यातील सर्व शाळांना वॉटर बेलचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा प्रारंभ ढवाण वस्ती शाळेत झाला. येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूलमध्येही “वॉटर बेल’ उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. प्राचार्या राखी माथूर यांनी नियमित व वेळेवर पाणी पिण्याच्या महत्वाबाबत माहिती दिली. हा उपक्रम नियमितपणे शाळेत राबविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दररोज मुलांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र वेळ दिला जाणार आहे.