पाणी प्राधिकरणाचे अन्‌ बिल नगरपालिकेला

भोसले मळ्यात वसुलीचा सावळा गोंधळ
सातारा –
राधिका रोड लगतच्या भोसले मळ्यामध्ये पाणी प्राधिकरणाचे आणि बिल मात्र नगरपालिकेला असा सावळा गोंधळ समोर आला आहे. भोसले मळ्यात प्राधिकरणाच्या तीनशे थकबाकीदारांचे पन्नास लाख रुपये बिल प्रलंबित आहे. ही नळ कनेक्‍शन तोडण्याच्या कारवाई संदर्भात गेलेल्या पथकाला नगराध्यक्ष माधवी कदम यांनी बुधवारी रोखले. आम्ही बिलं नगरपालिकेला भरल्याचे सांगत थकबाकीदारांनी हात वर केल्याने प्रत्यक्ष वसुलीचा गुंता वाढला आहे. राधिका रोडवरील भोसले मळा या भागाला बुधवार नाका टाकी व भैरोबा टाकीने पाणीपुरवठा केला जातो. मात्र या भागाची वितरण व्यवस्था उरमोडी उदभवाच्या विरुद्ध दिशेला असल्याने या भागाला कृष्णा नदीतून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो.

भोसले मळ्यात कदम पेट्रोल पंपाच्या पिछाडीला प्राधिकरणाचे 310 थकबाकीदार असून त्यांनी 2014 पासून प्राधिकरणाला पाणीपट्टीच भरली नसल्याने थकबाकीचा आकडा पन्नास लाख रुपये पर्यंत गेला आहे. त्या वसुलीसाठी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी धडक मोहिम हाती घेतली आणि सदर बझारमधून भोसले मळ्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा मुख्य व्हॉल्व बंद करण्यासाठी प्राधिकरणाचे पथक सकाळी पावणेबारा वाजता पोहोचले. ही कारवाई लक्षात येताच काही नागरिकांचा कर्मचाऱ्यांशी वाद सुरू झाला . त्यांनी नगरसेवक राजू भोसले यांना कळवताच तेही घटनास्थळी हजर झाले.

नळ कनेक्‍शन कारवाई का करताय अशी विचारणा केली ? तेव्हा थकबाकी असल्याने ही कारवाई सुरू केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र ही हद्द पालिकेची आहे आम्ही घरपट्टीसमवेत नळपट्टी पालिकेत भरतो असा पवित्रा थकबाकीदारांना पुन्हा गोंधळाला सुरवात झाली . तासभर सुरू राहिलेल्या खडाखडीने वातावरण तप्त झाले. राजू भोसले यांनी तातडीने संपर्क केल्याने नगराध्यक्ष माधवी कदम यांनी घटनास्थळी येऊन कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. आधी तुम्ही नागरिकांना नोटीस देण्याआधीच कारवाई कशी करता अशी विचारणा केली. तेथील वाढता विरोध लक्षात घेऊन प्राधिकरणाने ही मोहीम गुंडाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)