नगर (प्रतिनिधी) – जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या माहिती अगोदरच सोशल मीडियात “करोना’संदर्भात भीतीदायक वृत्त पसरविण्याचे उद्योग रिकामटेकड्यांकडून सुरु आहेत. त्यामुळे अशा सोशल मीडियाच्या गृपवर जिल्हा प्रशासानाचा खास “वॉच’ असून त्या महाभागांवर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रादेशिक तपास समितीची आता स्थापना झाली असून, या समितीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
दररम्यान, करोनासंदर्भात वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी खास प्रचार यंत्रणा उभी करण्यात आली आहे. त्याच्या प्रचारासाठी शहरात 20 ऑटोरिक्षा नेमण्यात आल्या आहेत. त्याद्वारे जिल्ह्यातील खरी माहिती जनतेला देऊन जनजागृती करण्याचाही जिल्हा प्रशासानाचा प्रयत्न आहे.
कोरोनासंदर्भात अफवा किंवा चुकीच्या बातम्या पसरु नये, यासाठी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे खबरदारीच्या उपाययोजनांचा ऑटोरिक्षातून ध्वनिक्षेपकाद्वारे ग्रामीण भागातही प्रचार करण्यात येणार आहे. त्यात स्थानिक भागात वस्तुस्थितीची पडताळणी करून खरी माहितीच जनतेपर्यंत पोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
करोनाचा प्रचार करण्यासाठी ऑटो रिक्षांसह अन्य काही वाहने नियुक्त करण्यात येणार आहेत. खास करुन करोना बाधित झालेल्या भागात प्रचारावर जास्त भर दिला जाणार आहे. साधारणपणे या परिसरात दिवसभरात 8 ते 10 तास प्रचार केला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
करोना संदर्भात वैयक्तिक स्वच्छता, लॉकडाऊनच्या कालावधीत घरी राहून करायच्या उपाययोजना, घराबाहेर पडल्यावर आवश्यक असलेले सामाजिक अंतर राखणे, सरकारच्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे, अफवांचा फैलाव रोखणे, लॉकडाऊनच्या काळात कृषी संदर्भातील माहितीसह अत्यावश्यक सेवांसंदर्भात माहितीही या प्रचारादरम्यान दिली जाणार आहे.
कलाकारांची घेणार मदत…!
करोनाच्या चुकीच्या बातम्या रोखण्यासाठीया या प्रचारमोहीमेत आणखी चांगला व परीणामकारक प्रचार होण्यासाठी संगीत-नाट्य कलाकारांची मदत घेण्यात आली आह. त्यासाठी स्थानिक भाषेत श्रवणीय संदेश व गाणी तयार करण्यात आली आहेत. यातून आणखी चांगले अपिल करण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.