“क्राईम पेट्रोल’ मालिका बघून त्यांनी रचला लुटीचा बनाव

पिंपरी – क्राईम पेट्रोल मालिका बघून लाखो रुपये लुटण्याचा बनाव त्यांनी रचला. पण पोलिसांनी केलेल्या प्रश्‍नांच्या सरबतींपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. अवघ्या बारा तासांत पोलिसांनी त्यांच्या बनावाची पोलखोल केली आणि लुटलेल्या पैशांसह 34 लाख 39 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

कुणाल रविंद्र पवार (वय 20), ओंकार उर्फ मोन्या बाळासाहेब भोगाडे (वय 21, दोघे रा. हनुमान कॉलनी, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा लॉजीकॅश कंपनीमध्ये कामाला होता. ही कंपनी मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या कंपनीतून रोकड जमा करून ते बॅंकेत भरते. गुन्हेगारीवर आधारित असलेली क्राईम पेट्रोल ही मालिका बघून कुणाल याने कंपनीची रोकड लुटण्याची योजना आखली.

बुधवारी (दि. 14) कुणाल याचा सहकारी सुट्टीवर असल्याने शहराच्या विविध भागातून कंपनीची रोकड जमा करुन ताथवडे येथे चालला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कुणालकडे जमा झालेली 33 लाख 30 हजार 464 रोकड लुटून नेली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कुणाल यानेच फिर्याद दिली.

देहूरोड पोलिसांसोबत गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा पाचच्या पोलिसांनी सुरू केला. पोलिसांनी कुणालकडे झालेल्या घटनेबाबत चौकशी केली असता त्याच्या माहितीमध्ये तफावत आढळली. पोलिसांनी तांत्रिक मुद्‌द्‌यांच्या आधारे तपास केला असता कुणाल पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले. तपासात कुणाल याच्यासोबत त्याचा मित्र ओंकार त्याला देहूरोड येथे भेटल्याचे आढळले. पोलिसांनी ओंकारला ताब्यात घेऊन कसून चौकशी करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पोलिसांनी दोघांकडून 33 लाख 24 हजार 463 रुपये रक्कम, गुन्हयामध्ये वापरलेल्या दोन दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 34 लाख 39 हजार 463 रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.